रुद्र-सती कथा (Marathi)


पुराण कथांनुसार असे मानले जाते की प्राचीन काळी ब्रम्हदेवाने त्याचा मानसपुत्र 'प्रजापती दक्ष' याची उत्पत्ती केली. दक्ष यास राजांचा देवता म्हणून मानले जाऊ लागले. दक्षास साठ कन्या झाल्या त्यापैकीच एक कन्या म्हणजे 'सती'. त्याच काळी कैलास पर्वताच्या क्षेत्रात शिवाचा अवतार असलेला महान योगी 'रुद्र' निवास करत असे. रुद्राच्या सेवेत जे लोक तेथे असत त्यांना रुद्रगण असे म्हटले जात. त्याच पैकी एक म्हणजे 'नंदी'. पुढे ब्रम्हदेवाच्या सांगण्यावरून दक्षाने आपली कन्या 'सती' चा विवाह 'रुद्र' संगे केला. रुद्र व सती कैलास पर्वताच्या क्षेत्रात आनंदाने राहू लागले. काही काळ उलटल्यावर एके दिवशी दक्षाने एका ठिकाणी मोठा यज्ञ आयोजित केला. त्यासाठी त्याने मोठमोठ्या ऋषी-मुनींना, राजांना, देव लोकांना, आमंत्रित केले. रुद्र व सती यांनाही या यज्ञासाठी आमंत्रित केले. यज्ञाच्या दिवशी सर्वमंडळी त्या ठिकाणी पोहोचले. प्रत्येकजण दक्षाला आदराने प्रणाम करून आपल्या जागी विराजमान झाले. पण महान योगी असलेल्या व आपल्या अंतःकरणातील परमात्म्यात तल्लीन झालेल्या रुद्राने दक्षास प्रणाम केला नाही. हे पाहून दक्षास रुद्राचा राग आला. सर्व राजा, ऋषी-मुनी, देव लोक आपल्याला प्रणाम करतात; पण हा अंगावर भस्म लावून नेहमी स्मशानात बसून राहणारा मला प्रणाम का करत नाही ? असे म्हणून दक्षाने रुद्रास ना-ना बोल सुनावले. राजांचा राजा, ब्रम्हांडाचा अधिपति असल्या कारणाने दक्षाला अहंकार आला होता.  रुद्राला जाणणारे अतिथी दक्षास समजावून सांगू लागले की रुद्र हा कोणी साधारण योगी नाही; तो साक्षात शिवाचा अवतार आहे. पण अहंकार आलेल्या दक्षास काही फरक पडला नाही. रुद्रास अपशब्द बोललेले नंदीला सहन झाले नाही; नंदी व दक्ष यांच्यात काही वेळ शाब्दिक वाद झाला. शांत चित्त असणार्‍या रुद्राने नंदीस समजावले, आणि रुद्र सती व आपल्या गणांसह कैलासाला परतला. दक्षाच्या मनात रुद्राबद्दल द्वेष निर्माण झाला होता; अहंकारामुळे तो रुद्र हा शिवाचा अवतार असल्याचे विसरून गेला.

काही काळ उलट्यावर दक्षाने आणखी एकदा मोठा यज्ञ सोहळा आयोजित केला. यावेळीही त्याने समस्त मोठ-मोठे राजे, ऋषी-मुनी यांसह ब्रम्हा व विष्णु यांनाही आमंत्रित केले. अतिशय भव्य-दिव्य असा यज्ञ मंडप उभारला. या भव्य अशा सोहळ्यास त्याने आपल्या इतर कन्यांना, त्यांच्या पतींना आमंत्रित केले; पण रुद्र-सती यांस आमंत्रित केले नाही. त्या सोहळ्यास आलेले काही ऋषी-मुनी हे रुद्र व सती उपस्थित नसलेले पाहून दक्षास याबद्दल विचारण्यास गेले. तेव्हा त्यांना दक्षाने सांगितले, की ब्रम्हा व विष्णु इथे उपस्थित असताना रुद्रास बोलवण्याची गरज वाटली नाही. यावर त्या काही ऋषी-मुनींनी दक्षाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की रुद्र व सती शिवाय हा यज्ञ' करूनही काहीच उपयोग नाही. परंतु रुद्राबद्दल मनात द्वेष निर्माण झालेला दक्ष आपल्या निर्णयावर अडून बसला. हे पाहून ते काही ऋषी-मुनी यज्ञ मंडप सोडून निघून गेले. आता दक्षाला आणखी राग आला व त्याने त्या ऋषी-मुनींनाही ना-ना बोल सुनावले. बाकी उपस्थित अनेक ऋष-मुनी, ब्रम्हा व विष्णु यांच्या उपस्थितीत यज्ञास सुरुवात करण्यात आली. हा सोहळा अनेक दिवस चालणार होता. एक-एक अतिथी त्यास हजेरी लावण्यास जात होते. सती ची बहीण रोहिणी ही त्या यज्ञास जात असल्याचे सतीस माहीत पडले. आपल्या पित्याने आपल्याला का बरं निमंत्रण दिले नाही याचा विचार करत सती रुद्राजवळ पोहोचली. यज्ञ सोहळ्याबद्दल माहिती देऊन, आपणही तिकडे जाण्याचा आग्रह केला. रुद्राने सतीस समजावण्याचा प्रयत्न केला, की दक्षाच्या मनात अहंकार निर्माण झाला आहे, आपल्याबद्दल द्वेष निर्माण झाला आहे; त्यामुळे निमंत्रण आले नसावे. असे निमंत्रणाविना तिकडे जाणे योग्य नाही. तरीही सतीने तिकडे जाण्याचा आग्रह धरला; आपल्या पित्याला निमंत्रण न देण्याचे कारण विचारायला हवे असे तिला वाटले. रुद्राने स्वतः तिकडे जाण्यास नकार दिला; सतीला जाण्याची इच्छा असेल तर एकटीनेच तिकडे जाण्यास सांगितले. सती एकटीच तिकडे जाण्यास तयार झाली. काही करून तिला आपल्या पित्याला त्यांच्या अशा वागण्याचे कारण विचारायचे होते. रुद्राने सती सोबत नंदी व काही रुद्रगण यांना यज्ञ स्थळाकडे धाडले. यज्ञ स्थळावर पोहोचताच नंदी व रुद्रगण यज्ञ मंडपापासून बाहेरच थांबले. सती यज्ञ मंडपात पोहोचली. आपल्या आई व बहिणींना भेटून त्यांची विचारपूस करू लागली. त्यानंतर तिच्या लक्षात आले, की आपले पिता पूर्वीसारखे आपल्यासोबत वागत नाहीत. दक्षाच्या भीतीने यज्ञ मंडपात कोणीही आपला आदर सत्कार करत नाही. सतीने पित्यास नमस्कार केला. परंतु दक्षाने कसलेच उत्तर दिले नाही व सतीला दुर्लक्षित केले. दक्षाचे असे तिरस्काराचे वागणे पाहून सतीला राग आला व तिने चिडून यज्ञ सोहळ्यास आपल्याला आमंत्रण का दिले नाही याबद्दल विचारणा केली. तेव्हा अहंकाराने व द्वेषाने दक्ष म्हणाला, की तुझ्या पती रुद्रामुळे हा यज्ञ फळास जाणार नाही; नेहमी स्मशानात राहणार्‍या रुद्राच्या इथे उपस्थित राहण्याने येथे अशुभ होईल. केवळ ब्रम्हदेवाच्या सांगण्यावरून तुझा विवाह त्याच्याबरोबर लावून दिला; अन्यथा तुझा पती होण्याची त्याची पात्रता नाही. निमंत्रण नसताना तू इथे आली आहेस; आता इथे थांबायचे असेल तर थांब; आम्ही तुला आग्रह करत नाही. आपल्या पती रुद्राबद्दलचे हे अपशब्द ऐकून व पित्याकडून झालेला अपमान यामुळे सतीला खूप दु:ख झाले. आपले पती रुद्र नको म्हणत होते तरी आपण उगाच येथे आलो; इथे किती अपमान झाला हे त्यांना कसे सांगणार? या भावनेने सतीने यज्ञ अग्नीत उडी घेऊन आपले प्राण त्यागले. यज्ञ मंडपात एकच गोंधळ झाला. हे पाहून बाहेर उभे असलेले नंदी व रुद्रगण मंडपात आले. घडलेला प्रकार लक्षात येताच काही रुद्रगण प्रचंड चिडले तर काहींना अतिशय दु:ख होऊन त्यांनी यज्ञात उड्या घेत प्राण त्यागले. चिडलेल्या नंदी व रुद्रगणांना रोखण्यासाठी दक्षाचे सैन्य पुढे सरसावले. दोन्ही गटात युद्ध सुरू झाले. काही रुद्रगणांनी कैलास पर्वताकडे धाव घेत तिथे पोहचून रुद्रास घडलेला प्रकार सांगितला. प्रचंड क्रोधित होऊन रुद्राने सेनापति विरभद्र व महाकाली यांच्या नेतृत्वात युद्धासाठी रुद्रगण पाठविले. विरभद्र व महाकाली ने यज्ञस्थळी पोहचून यज्ञाचा विध्वंस केला. सर्व ऋषी-मुनि, देव तेथून निघून गेले. दक्षाने विष्णुस रक्षा करण्याची विनंती केली. तेव्हा आपल्या भक्ताचे रक्षण करण्याचे कर्तव्य म्हणून विष्णूने विरभद्रासोबत युद्ध केले; पण पराक्रमी विरभद्रापुढे आपला टिकाव लागणार नाही हे ध्यानात येताच विष्णूदेव तेथून अप्रकट झाले. त्यांनंतर तेथे घनघोर युद्ध झाले आणि दक्षाच्या सैन्याला पराभूत करून विरभद्राने दक्षासही पकडून त्याचा शिरच्छेद करून त्याचे मुंडके यज्ञाच्या अग्नीत टाकले. यज्ञाचा विध्वंस करून सर्व रुद्रगण कैलासावर परत आले. त्यानंतर समस्त देवतांनी रुद्रास शांत होण्याची व दक्षास जीवंत करून यज्ञ कार्य पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याची विनंती केली. देवतांच्या विनंतीनंतर प्रसन्न होऊन रुद्राने दक्षास बकर्‍याचे मुंडके लावून जीवंत केले. आणि यज्ञ कार्य पार पडले अशी कथा आहे.

ही जरी पुराण कथा असली तरी या व अशा अनेक पुराण कथांमध्ये उल्लेखलेल्या घटनांचे प्रतीक पिढ्यान-पिढ्या पासून भारतातील लोकजीवनात अनेक प्रकारच्या रूढी-परंपरा म्हणून दिसून येतात. रुद्र-सती कथेमध्ये उल्लेख केलेल्या घटनांचे प्रतीक म्हणून आजही महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत पंथाचे लोक लग्न समारंभाच्या आदल्या दिवशी "गुग्गुळ" किंवा "धूप" खेळत मिरवणूक काढतात. दोन मडकी खालून अर्धे फोडून त्याचे तोंड खाली करून पालथे ठेवतात. खालून मडक्याचे तोंड बंद करून माडक्यात माती भरतात. मातीत वर उभे फुटभर लाकूड खुपसून त्याला वरच्या बाजूला कापड लावून ते पेटवतात. माडक्याला हार, पताका लावून सजवले जाते. म्हणजे एकप्रकारे यज्ञाची प्रतिकृती तयार करतात. ती पेटती मडकी घेऊन ढोल-पिपाणी च्या एका विशिष्ट तालावर ती मडकी हातात घेतलेली दोन माणसे एका विशिष्ट प्रकारे नाचत गावातून मिरवत नेतात. शेवटी मारुतीच्या मंदिरात नेऊन आरती करून ती मडकी विझवली जातात. काही गावांतील परंपरेनुसार ती त्यानंतर फोडली जातात तर काही गावांत ती तशीच विझवून सोडून दिली जातात. आताच्या काळात त्या "गुग्गुळ" किंवा "धूप" मिरवणूक काढण्याचे व शेवटी ते विझवण्याचे किंवा फोडण्याचे नेमके कारण बहुतेक लोक विसरून गेले आहेत आणि केवळ परंपरा म्हणून हे केले जाते. खरंतर या "गुग्गुळ" किंवा "धूप" मिरवणूक काढण्यामागे रुद्र-सती कथेमध्ये उल्लेख केलेल्या घटनांचे प्रतीक दाखवण्याचा हेतु असतो. भव्य-दिव्य प्रकारे आनंदात चाललेला दक्षाचा यज्ञ सतीच्या मृत्युच्या बदल्यासाठी ज्याप्रकारे रुद्रगणांनी उधळून टाकला त्या प्रकारे आनंदाने चाललेला "गुग्गुळ" किंवा "धूप" रूपी यज्ञ विझवून किंवा फोडून टाकला जातो.



tags: devi sati, shiv, rudra katha, shiv puran, rudra sanhita marathi, shiv-sati

Comments