वानर (हनुमान माकड) मराठी माहिती

वानर व माकड हे दोन वेगवेगळे प्राणी  आहेत. बहुतेक शहरी लोकं वनारांनाही माकडच म्हणतात. माकडे, व वानरे यांतील एक प्रमुख भेद येथे स्पष्ट केला पाहिजे, तो असा की, वानरांच्या शेपट्या माकडांपेक्षा फारच लांब असतात. दुसरी प्रमुख गोष्ट म्हणजे, माकडांच्या शरीराची ठेवण लहान व बुटकी असून, ती फारच जाडी असतात; तर वानरांचे शरीर लांब असून सुटसुटीत असते. हनुमान वानर, किंवा काळ्या तोंडाचे हे वानर, महाराष्ट्रातील जवळ-जवळ सर्व भागात दिसून येते. किंबहुना सबंध भारतभर ही वानरे दिसून येतात. हे वानर बसले असता त्याची उंची, ६० ते ७५ सेंटीमीटर भरते. त्याची शेपटी मात्र, ९० ते १०५ सेंटीमीटर लांब असते. आपल्याकडे सापडणाऱ्या ह्या वानरांचे वजन साधारणतः ९ ते १६ किलोग्रॅम भरते. परंतू ह्याच जातीच्या उत्तर हिंदुस्थान, तसेच हिमालयाच्या पायथ्याशी सापडणाऱ्या वानरांचे वजन, १६ ते २१ किलो ग्रॅम भरते. ह्या वानरांचे हातपाय व शेपटी फारच लांब असतात. शरीराचा रंग भुरकट पांढरा असून चेहरा व हातापायांचे पंजे काळे असतात. भारतात दिसून येणाऱ्या हवामानातील फरकानुसार निरनिराळ्या भागांत त्यांच्या शरीराचा रंग थोडाफार गडद अथवा फिकट, दिसून येतो. ही वानरे जेव्हा त्यांच्या शेपट्या वर करून चालतात तेव्हा त्यांचा रुबाब काही औरच असतो !

 

ही वानरे पूर्णपणे शाकाहारी असून ती पाने, फुले, रानटी फळे, झाडांची फळे इत्यादीवर अपली गुजराण करतात. रामाला सेतू बांधण्यात ह्या वानरांनी मदत केली अशा धार्मिक समजुतीमुळे ह्यांना मारणे हे हिंदु धर्माचे लोक पाप असे समजतात. त्यामुळे त्यांना सहसा कोणी मारत नाही. त्यामुळे गावाकडेही वानरे मंडईतून, देवळातून निर्भयपणे हिंडत असताना दिसून येत.


ही वानरे नेहमी २०-२५ च्या कळपाने दिसून येतात. सकाळच्या थंड प्रहरी ती खाद्य शोधावयास बाहेर पडतात. दुपारी उन्हाच्या वेळी पाण्याच्या असपास तसेच सावलीला विश्रांती घेताना दिसतात. पुन्हा संध्याकाळी बाहेर हिंडायला निघतात. ही वानरे माकडांना घाबरत असली तरी जंगलात कित्येकदा माकडांच्या कळपांबरोबर देखील हिंडताना दिसतात; परंतु रात्री मात्र बरोबर अपल्या ठराविक ठिकाणी झोपायला जातात. झोपेपर्यंत त्यांच्यामध्ये जागांवरुन भांडणे होत राहतात. रात्रीच्या वेळेस ही वानरे मोठ्या मोठ्या झाडांच्या पसरलेल्या फांद्यांच्या टोकाशी जाऊन झोपतात. रात्री वाघ अथवा बिबळे त्यांचे खाद्य शोधावयास बाहेर पडतात. बिबळ्याला माकडे, वानरे यांचे मास फारच आवडते व तो झाडावर चढण्यात फार पटाईत असतो; परंतु बिबळ्या वाघ फांदीच्या टोकाकडे येऊ लागताच त्याच्या वजनाच्या भाराने फांदी गदगदा हालू लागते व वानरांना इशारा मिळतो. ताबडतोब ती हुप्प हुप्प असा अवाज काढून सर्वांना सावध करतात. त्यामुळेच की काय, फांद्यांच्या टोकाकडे जाण्यावरुन त्यांच्यात भांडणे होत असावीत.


महाराष्ट्रातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, विदर्भ ह्या भागातील जंगलांतून ही सहसा मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. ह्यांच्यामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे कळप आढळून येतात. केव्हा केव्हा मोठ्या कळपांमध्ये छोटी-मोठी; नर-मादी अशी सर्वप्रकारची पुष्कळशी वानरे दिसून येतात तर केंव्हा केंव्हा फक्त एकच नर व त्याच्या पुष्कळशा माद्या व त्यांची पिल्ले अशा सबंध एकाच मोठ्या कुटुंबाचा कळप असलेला दिसून येतो. तर केंव्हा नुसते नरच एखाद्या कळपात दिसून येतात. ह्या वानरांमध्ये गर्भधारणेचा काल साधारणपणे ७ ते ९ महिने असतो. महाराष्ट्रात जानेवारी ते मार्चच्या सुमाराला नवीन पिल्ले जन्माला अलेली दिसतात. 


वानर शाकाहारी असल्याने एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी हिंडताना मधेच त्यांना फळभाज्या, शेंगा, पालेभाज्या यांची शेती दिसली की, सगळा कळप त्यावर तुटून पडतो, या टोळीला हाकलून लावले नाही तर  ही टोळी शेतीचे नुकसान करते. यावर उपाय म्हणजे माकडाची एक जोडी पाळणं. कारण वानरं माकडाला घाबरतात. माकड एकटेच पाळले, तर वानराची मादी त्याला नादी लावून पळवून नेते. म्हणून जोडी पाळतात. वानरांविषयी ग्रामीण भागांत आणखी एक गोष्ट ऐकायला मिळते, ती म्हणजे हिवाळ्यात थंडीपासून रक्षण करण्यासाठी माणूस शेकोटी पेटवून उब मिळवतो तसं वानरं लहान लहान लाकडांच्या काटक्यांची शेकोटी रचतात व डोळ्यांतून त्या रचलेल्या लाकडातील आग शोषून घेतात. ही आग शोषल्यानंतर ते लाकूड कितीही जाळण्याचा प्रयत्न केल्यास ते जळत नाही. वानारांच्या या शेकोटीची गोष्ट कोणत्याही वनअधिकारी, प्राणी शास्त्राचा अभ्यास करणार्‍या व्यक्तींकडून ऐकायला मिळत नाही. यावरून असे म्हणता येईल की, वानरे अशी शेकोटी करतात की नाही किंवा त्यांच्यात अशी उष्णता शोषून घेण्याची अलौकिक शक्ती आहे की नाही हे पडताळून पाहणे आपल्या पिढीचे काम आहे.


वानरांची टोळी उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येते, पाण्याचा मुबलक साठा मिळाला की काही दिवस गावातील उंच चिंच,  पिंपळ अशा मजबूत झाडांवर ही टोळी वास्तव्य करते. घराच्या अंगणात वाळत घातलेले उन्हाळी पदार्थ झाडावरून ह्या वनारांना बरोबर दिसतात व दुपारच्या वेळी उंच फांदीवरून खाली येऊन ही वानरे हळूच या पदार्थांवर तुटून पडतात. ही टोळी ज्या दोन-तीन झाडांवर वास्तव्याला असते त्याखाली त्यांच्या मल-मुत्राने घाण होते. ही वानरे सकाळी सकाळी हुप्प हुप्प करत इकडून तिकडे उड्या मारतात तेव्हा चिंचेच्या झाडाखाली पिकलेल्या चिंचांचा सडाच पडतो. गावाकडील घरांचे छप्पर पत्र्यांचे असल्याने वानरांच्या उड्यांनी पत्र्यांचे मोठे नुकसान होते. वानरांच्या या त्रासापायी ती गावातून लवकर निघून जावीत यासाठी त्यांना हाकालण्याचा उद्योग गावातील तरुण मंडळी सुटीच्या दिवशी करत असतात. लहान शाळकरी मुलांसाठी वानर हा चर्चेचा विषय बनलेला असतो, झाडावरच्या वानरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ही मुले छोटे छोटे दगड उगारत असतात पण उंच फांद्यांवर जाऊन बसलेल्या वांनारांपर्यंत ते दगड पोहोचतच नाहीत! वानराचा संबंध रामायनाशी जोडला गेल्यामुळे ही शाळकरी मुले 'रावणानं सीतेला पळवून नेलं' असे मोठमोठ्याने ओरडत असतात, त्यांचं हे बोलणं ऐकून वानरे सीतेच्या शोधात पळत सुटतील असा ह्या मुलांचा समज असतो. यासोबतच 'ए काळ्या तोंडाच्या' असे म्हणत ही मुले वानरांना डिवचत असतात. 'हुप्प हुप्प' असा आवाज करत वानरे उड्या मारू लागली की ही मुलेही 'हुप्प हुप्प' करत एकच गोंधळ करतात. वानरांवर दगड उगारला की त्यांच्या दातांचे सुळके दाखवत ख्याक ख्याक आवाज काढत माणसांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात. कित्येक वेळा अंगावर झेपही घेतात मात्र ती झेप माणसापासून काही अंतरावर येऊन थांबते कारण वानरेही माणसांना घाबरतात. शरीराने लहान दिसणारी माणसे किंवा लहान मुले असतील तर धीटपणे वानरे भीती दाखवत त्यांच्या अतिशय जवळ येतात, हातातील खाद्यपदार्थ हिसकावून घेण्यासाठी धडपड करतात. वानरे माणसांच्या कानाखाली चापट मारतात असा सर्वांचा समज असतो, परंतु चापट मारताना कोणी वानराला पाहिले नसल्याचेच बरेच लोक सांगतात त्यामुळे हा निव्वळ समजच आहे असे म्हणावे लागेल. शेतात जाणार्‍या एकट्या दुकट्या स्त्रियांचा रस्ता वानरांची टोळी आडवते व त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करते असाही समज सर्वच गावांत पसरलेला आहे, मात्र याचेही काही साक्षी पुरावे सापडत नाहीत. 


वाघ व बिबट्या व्यतिरिक्त कुत्र्याचे वानरांशी काय वैर असते कुणास ठाऊक! वानरे दिसली की त्यांचा पाठलाग करत कुत्रे घरांच्या पात्र्यांवर चढतात व तेथून भुंकत राहतात. वानरांची लहान पिले किंवा लहान वानरे कुत्र्यांच्या तावडीत सापडली की कुत्रे त्यांना रक्तबंबाळ करतात. कधी कधी एखादे कुत्रेही वानरांच्या तावडीत सापडले की ते त्याचा पाय ओढून फरफटत नेण्याचा प्रयत्न करतात. असाच एक कुत्रा झाडाखाली थांबून वरच्या वानरांना भुंकत असताना एक मोठा धीट वानर दात दाखवीत ख्याक ख्याक करीत खाली आला व कुत्र्याच्या मागच्या पायास धरून झाडावर थोडे वर जाऊन त्यास खाली सोडून दिले, कुत्रा जमिनीवर आदळताच कुई कुई करत तेथून पळून गेला. वानरे माणसांना ईजा पोहोचवत नसली तरी एखादे पिसाळलेले किंवा धीट वानर माणसांचा चावा घेऊ शकते त्यामुळे वानरांच्या टोळीपासून काही अंतर दूर राहिलेले बरे. असा समज आहे की, वानरांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू नये. डोळ्यात डोळे घालून  पाहणे म्हणजे भांडनासाठी त्यांना आमंत्रण दिल्यासारखे आहे. कारण जो टोळीचा प्रमुख नर असतो, त्याच्याशी वैर घ्यायचे असेल व त्याला चॅलेंज करायचे असेल तर इतर नर त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहतो व लगेच दोघांमध्ये वर्चस्वारून भांडण सुरू होते. 


वानरे नेहमी टोळी करूनच वावरतात . टोळीमध्ये कळपाचा एक प्रमुख नर असतो. हा नर जिकडे जाईल तिकडे सर्व टोळी त्याच्या मागोमाग हिंडत असते. टोळीचा प्रमुख होण्यासाठी टोळीतील नरांमध्ये भांडणे होत असतात, ही भांडणे कधी कधी इतकी टोकाला जातात की शक्तीशाली नर इतर नरांना रक्तबंबाळ करून सोडतो. जखमी झालेले इतर नर स्वतःची एक वेगळी टोळी बनवून मुख्य टोळीच्या सोबतच मात्र मुख्य टोळीच्या नराला घाबरूनच हिंडत असतात. टोळीतील काही माद्या मुख्य नराशी जवळीक ठेऊन असतात त्यामुळे मुख्य नराला आवडणार्‍या या माद्यांचाही टोळीत दरारा असतो. चांगल्या खाद्यावर सर्वप्रथम मुख्य नर व त्याला आवडणार्‍या माद्यांचा अधिकार असतो व त्यांच्या नंतर टोळीतील इतर वानरे हळूहळू खायला सुरुवात करतात. निवांत वेळी ही वानरे एकमेकांच्या केसांतील कीटक मारून खातात त्यामुळे वनारांना पुर्णपणे शाकाहारी म्हणावे की नाही असा प्रश्न पडतो. केसांतील कीटक शोधून मारल्याने त्यांचे शरीर स्वच्छ राहते. 


-JuniorWriter


वानर माहिती मराठी, माकड माहिती मराठी, हनुमान माकड

Comments