जॉन विक - Chapter 1

प्रसंग १ :

एक थरारक रात्र.....रिमझिम पावसाच्या सरीत दोन्ही बाजूचे काच पूर्ण फुटलेली, उजव्या बाजूने पुढच्या चाकामागे दरवाजाच्या खालच्या भागात जोरात ठोकलेली चकचकीत काळी महागडी कार एका मोठ्या शॉप बाहेरील कठड्याला येऊन धडकते....पिचकलेल्या दरवाजाला लाथ मारत सुटाबुटातला, चाळीशी ओलांडलेला, देखणा, उंचीपुरा, दाढी मिशा सुरेख कोरलेला एक जखमी माणूस डाव्या कमरेजवळ पोटाच्या भागात झालेली जखम हाताने झाकत, कन्हत, धापा टाकत कसाबसा त्या ठोकलेल्या गाडीतून उतरून त्या शॉपच्या शटरपुढे येऊन कोसळतो. अंगात कसलेच बळ उरले नसल्याने तो तसाच तोंडाने श्वास घेत पालथा पडून राहतो......काही मिनिटांनी कोटाच्या उजव्या खिशातून फोन बाहेर काढून एक विडियो चालू करून पाहू लागतो. विडियोमध्ये एक स्त्री आपल्या पाळीव श्वानासोबत हसत, आनंदी चेहर्‍याने एका बीचवर वावरत असते. तिच्या चेहर्‍यावरील ते हास्य पाहून तो जखमी व्यक्ति तशा अवस्थेतही काहीसा सुखावतो. बहुतेक तो त्याच्या पत्नीचा विडियो असावा. काही मिनिट पुन्हा पुन्हा तो विडियो पाहून कुठून त्याच्या अंगात ताकत संचारते देव जाणे ! तो उठून त्या शॉपचे कुलूप तोडण्यासाठी त्यावर आपल्या पिस्टलने नेम धरत गोळी झाडतो. कुलूप तुटून बाजूला पडताच शटर गुडघ्या इतके उचलून गुडघ्यावर रांगत तो आतमध्ये शिरतो. बोर्डावरचे सगळे खटके दाबताच शॉप आतून लाईटने उजळून निघताच दिसते की त्या पेट शॉप मध्ये विविध जातीची कुत्री पिंजर्‍यात विकण्यासाठी ठेवलेली असतात. तो व्यक्ति त्या विडियोमध्ये जे कुत्रं असतं तशाच प्रकारचं कुत्रं शोधू लागतो, पण तसं कुत्रं मिळत नाही म्हणून शेवटी एक अर्ध्या पांढर्‍या व अर्ध्या गडद राखाडी रंगाच्या कुत्र्यापाशी येऊन थांबतो. ते कुत्रं त्याच्याकडे अतिशय आशेने पाहत असते की हा व्यक्ति आपल्याला घेऊन जाईल. तो व्यक्तीही त्या कुत्र्याच्या डोळ्यातील भाव ओळखून त्याला पिंजर्‍यातून बाहेर काढत आपल्या सोबत घेऊन बाहेर येतो. त्या ठोकलेल्या कारमध्ये बसून रिमझिम पावसात कार पळवू लागतो व शहराबाहेर एका सुनसान, कमी वस्ती असलेल्या ठिकाणी त्याच्या सुसज्ज बंगल्याबाहेर येऊन थांबतो अन कुत्र्याला घेऊन घरात जातो.

प्रसंग २ :

(प्रसंग १ च्या पूर्वीचा काळ)

आपली चकचकीत काळी महागडी कार घेऊन एक ऊंचीपुरा, देखणा व्यक्ति शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी येऊन थांबतो. तो तिथे थांबताच त्याच्या लक्षात येते की दोन पंचविशी ओलांडलेली तरुण पोरं त्याच्याच दिशेनं येत आहेत. एकाने फिकट राखाडी मोकळ्या गुंड्यांचा सूट घातलेला आहे; डोक्यावर गावस्कर घालतो तशी त्याच फिकट राखाडी रंगाची टोपी अन तोंडात काहीतरी चघळत येत आहे. दूसरा थोड्या कुरळ्या केसांचा तरुण ज्याने काळी जीन्स अन डार्क ब्राऊन मोकळ्या रंगाचा चकचकीत जॅकेट, त्याच्या आत पांढरा टीशर्ट, हातात महागडे घड्याळ घातलेला तरुण त्या पहिल्या तरुणाला मागे राहायला सांगत त्या व्यक्तीच्या कारपाशी येऊन थांबतो. काचेवर नॉक करत काच खाली घ्यायला सांगतो. मग आतून तो व्यक्ति काच खाली घेत प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहतो. तो तरुण त्या पुढच्या खिडकीतून आत डोके घालत बोलतो, "अरे वाह! ही कार तर एकदम झकास आहे! चांगलं ठेवलं आहे तुम्ही कारला" तरुणाच्या या म्हणण्याला उत्तर देत तो व्यक्ति बोलतो, "कारची तारीफ ऐकून बरं वाटलं." आणि तो त्याला नजरेनेच बाजूला हो असे सांगतो. पण तरुण बाजूला न होता मिस्किलपणे हसत म्हणतो, "अरे ! मी तर तुमच्या कारचा ग्राहक आहे; आणि तुम्ही मला बाजूला व्हायला सांगताय?" एवढं बोलून तो खिडकीतून मागे त्याच्या सोबत असलेल्या तरुणाकडे पाहून हसत बोलतो, "च्यायला हा अंकल शहरात नवीन आलाय वाटतं; याला आपल्याबद्दल माहिती करून द्यायला हवं." मग दोघेही काही क्षण त्या व्यक्तीकडे पाहून हसून झाल्यावर तो तरुण पुन्हा खिडकीतून आत डोकावत विचारतो, "सांग रे अंकल, केवढ्याला देणार ही कार?" त्याच्या या प्रश्नाला थोडाही भाव न देता तो कारमधील व्यक्ती बोलतो, "पण ही कार विकण्यासाठी उपलब्ध नाही! चल बाजूला हो!" आणि कार स्टार्ट करून इंधनाचे पैसे पंपवाल्याला देत तो व्यक्ती आपल्या वाटेवर निघून जातो. तिकडे रागाने तापलेला तो तरुण त्या दुसर्‍या तरुणाला बोलतो, "मला हा माणूस कुठे राहतो ते लवकरात लवकर कळायला पाहिजे; याची कार कुठल्याही पद्धतीने घेतल्याशिवाय मी आता घरी जाणार नाही" तो दूसरा तरुण त्याच्या इतर साथीदारांना फोनवरून कळवतो की या मॉडेलची काळी चकचकीत कार या दिशेला निघाली आहे तिचा माग घेऊन त्या माणसाचा पत्ता शोधून काढा.  

Comments