गुणनिधी कथा (Marathi)

पुराण कथेनुसार कांपिल्य नावाच्या नगरात दीक्षित नावाचा ब्राम्हण आपल्या कुटुंबासंगे राहत असे. यज्ञ विद्येत पारंगत असलेले हे दीक्षित त्या नगरात प्रसिद्ध होते. त्यांना गुणनिधी नावाचा एक मुलगा होता. गुणनिधीलाही वडिलांसोबत राहून अनेक प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले. परंतु तरुण वयात तो मित्रांच्या संगतीने चुकीच्या मार्गाला लागला. जुगार खेळू लागला. तो दिवसभर जुगार खेळत बसे किंवा नाच-गाणे वाल्यांसोबत फिरत असे. त्याची आई त्याला चांगल्या मार्गावर आणण्यासाठी खूप प्रयत्न करत असे, त्याच्या वडिलांसोबत यज्ञ वगैरे विधिस जाण्यास सांगत असे; पण गुणनिधी तिचे काही एक ऐकत नसे. जेव्हा दीक्षित महोदय त्याची विचारपूस करत तेव्हा काहीतरी खोटे बोलून तो वेळ मारून नेत असे. त्याची आईही एकुलत्या पुत्र प्रेमापोटी त्याच्या वडिलांना त्याच्या वाईट गुणांबद्दल सांगण्यास घाबरत असे. कालांतराने गुणनिधीचा विवाह झाला. आता तरी तो चांगल्या मार्गाला लागेल अशी आईची समजूत होती. परंतु गुणनिधीच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. दिवसेंदिवस तो आणखी बिगडत चालला होता. दीक्षित महोदयांना आपल्या पुत्राच्या वाईट गुणांबद्दल काही एक माहीत नव्हते. 

एके दिवशी गुणनिधिने वडिलांची अंगठी चोरली आणि जुगारात ती गमावून बसला. अंगठी चोरी झाल्याचे दीक्षित महोदयांना कळाले. योगायोगाने एकदा ती अंगठी त्यांना एका जुगार खेळणार्‍याच्या हातात दिसली. त्यांनी त्याला अंगठी बद्दल विचारले; तेव्हा घाबरलेल्या त्या जुगार्‍याने खरे काय ते सांगितले. त्याला आणखी विचारणा केली असता त्यांना कळाले की गुणनिधी अशाप्रकारे रोज काही ना काही वस्तू जुगारात गमावतो. आपल्या प्रिय पुत्राच्या खर्‍या गुणांबद्दल माहीत झाल्यावर शरमेने मान खाली घालून दीक्षित त्यांच्या घरी परतले. त्यांनी पत्नीला बोलावून पुत्राच्या गुणांबद्दल विचारले तेव्हा नेहमीप्रमाणे तिने पुत्राला वाचवण्याचा प्रयत्न केला. पत्नीचे खोटे बोल ऐकून त्यांना प्रचंड राग आला. त्यांनी गुणनिधीला घरातून हाकलून दिले. गुणनिधी पोटाची भूक भागवण्यासाठी गावो-गाव भटकू लागला. एके दिवशी त्याला खूप भूक लागली होती, काही दिवसांपासून त्याला काहीच खायला मिळाले नव्हते. एका शिव मंदीराबाहेर येऊन तो बसला. काही वेळाने एक कुटुंब तेथे पूजेसाठी आले. पुजा करून त्यांनी मंदिरात नैवेद्य म्हणून विविध पक्वान्न ठेवले. काही वेळाने दिवस मावळला, अंधार असल्याचे पाहून गुणनिधी मंदिरात गेला. आपल्या कपड्याचा एक भाग फाडून दिव्याला पेटवून उजेड केला आणि तो नैवेद्य घेऊन तो बाहेर पडू लागला. परंतु दुर्दैवाने मंदीराबाहेर आलेल्या काही लोकांनी त्याला बाहेर पडताना पाहिले. त्याने मंदिरात चोरी केली असावी असे समजून त्याला पकडले. बघता-बघता आणखी लोक जमा झाले व संतप्त लोकांनी त्याला बदडले. पोटात अन्नाचा कणही नसल्यामुळे आधीच कमजोर झालेल्या गुणनिधीने लोकांचा मार सहन न झाल्याने तिथेच प्राण सोडले. 

त्याचे प्राण घेऊन यमदूत निघाले असता शिवाच्या गणांनी त्यांना आडवले. गुणनिधीने खूप पाप केले आहेत त्यामुळे त्याला नरकात घेऊन जात असल्याचे यमदूतांनी सांगितले. पण शिवाच्या गणांनी गुणनिधीने नकळत काही पुण्यही केले असल्याचे सांगितले. जेव्हा तो लहान होता तेव्हापासून तो आपल्या वडिलांबरोबर अनेक यज्ञ व पुजा विधीसाठी उपस्थित राहिला. अनेक  वेळा त्यानेही हे सर्व कार्य केले. त्याचबरोबर कित्येक दिवस उपाशी राहून त्याने उपवासही केला, आपल्या कपड्यांना फाडून त्याने मंदिरात शिवाच्या पिंडीसमोर दिव्यात तो कपडा पेटवून दीपदानही केले. त्यामुळे गुणनिधीची जागा नरकात नसून कैलासावर आहे असे सांगून शिवाच्या गणांनी त्याला आपल्या सोबत घेतले. कैलासावर पोहोचताच साक्षात शिव व देवी उमा यांचे दर्शन घेऊन तो धन्य झाला. पुढे त्याचा जन्म कलिंग चा राजा अरिंदम याच्या पुत्राच्या रूपात झाला. त्याचे नाव 'दम' असे होते. दम हा लहानपनापासूनच शिवाची भक्ति करू लागला. त्याने अनेक शिवालय बांधली, आपल्या राज्यात सर्वत्र शिवाचा प्रसार केला.

Comments