बालपण व शिक्षण
महात्मा जोतिराव फुले यांचे पूर्वज हे मुळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण या गावचे. त्यांचे मुळ आडनाव हे गोर्हे असे होते. काही कारणास्तव स्थलांतरील होऊन ते पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात खानवडी या गावी राहू लागले. पुढे जोतिरावांचे वडील गोविंदराव व वडिलांचे दोन भाऊ यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला; त्यात त्यांना चांगले यश मिळाले. फुलांच्या व्यवसायामुळे लोक त्यांना फुले म्हणून ओळखू लागले व पुढे फुले हे पडनावच आडनाव म्हणून प्रचलित झाले. गोविंदराव फुले यांचा विवाह धनकवडी येथील शिवा झगडेपाटील यांची कन्या चिमणाबाई यांच्याशी झाला. गोविंदराव व चिमणाबाई यांना राजाराम व धोंडीबा अशी दोन मुले झाली; धोंडीबा लहानपणीच वारले व त्यानंतर बर्याच काळानंतर 11 एप्रिल 1827 रोजी जोतिराव यांचा जन्म झाला.जोतिराव साडेआठ महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आई चिमणाबाई यांचे निधन झाले. पुढील दीड वर्ष त्यांचा सांभाळ गोविंदरावांनी केला. त्यानंतर काही काळ जोतिरावांची मावस बहीण सगुणाबाई यांनी जोतिरावांस सांभाळले. पुढे गोविंदरावांनी चिमाबाई यांच्याशी दूसरा विवाह केला. आता गोविंदराव व चिमाबाई जोतिरावांना सांभाळू लागले. पुढे जोतिरावांना शाळेत घालण्यात आले व त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. 1833 मध्ये जोतिरावांना चर्च ऑफ स्कॉटलंड मिशनच्या शाळेत घालण्यात आले; मात्र काही काळातच उच्च वर्णीय लोकांनी जोतिरावांना शाळेत येण्यास विरोध सुरू केला. शिक्षण केवळ उच्च वर्णीय लोकांनीच घेतले पाहिजे अशी त्याकाळी सर्व समाजाची समजूत होती. अखेर 1836 मध्ये विरोधाला कंटाळून गोविंदरावांनी जोतिरावांचे शिक्षण थांबवले. त्यावेळी जोतिराव केवळ नऊ वर्षांचे होते. शिक्षण बंद झाल्यामुळे जोतिराव वडिलांच्या बागेत काम करू लागले. पुढे बराच काळ जोतिरावांचे शिक्षण बंद राहिले. गोविंदरावांचे शेजारी मुन्शी व लिजिट या व्यक्तींना जोतिराव एक हुशार विद्यार्थी असल्याचे ध्यानात आले. त्यांनी गोविंदरावांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले व समाजाचा विरोध फाट्यावर मारून 1841 मध्ये जोतिरावांनी पुन्हा एकदा स्कॉटलंड मिशनच्या शाळेत प्रवेश घेतला आणि त्यांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले.
त्याकाळी लवकर लग्न करण्याची पद्धत समाजात रूढ होती. 1840 मध्ये वयाच्या चौदाव्या वर्षी जोतिरावांचा विवाह नायगाव येथील खंडोजी नेवसेपाटील यांची कन्या सावित्री यांच्याशी झाला. सावित्री यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता. पुढे जोतिरावांनी आपले शिक्षण चालूच ठेवले. त्याकाळी भारतात सातवी पर्यंतचे शिक्षण घेणे म्हणजे खूप मोठी बाब होती. सातवी नंतर शिक्षणही सर्वत्र उपलब्ध नव्हते. अगदी मोजक्याच ठिकाणी पुढील शिक्षण उपलब्ध होते. त्यामुळे जोतिरावांचे शिक्षण इंग्रजी सातवी पर्यंत झाले. त्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, हिन्दी, कानडी, मद्रासी, गुजराती या भाषांचे ज्ञान होते. शाळा सोडल्यानंतर पुढील काळात त्यांनी संस्कृत भाषेचे ज्ञानही मिळवले.
क्रांतीची ठिणगी व शिक्षणातील क्रांती
वयाच्या एकविसाव्या वर्षी जोतिराव आपल्या एका मित्राच्या लग्नाच्या वरतीतील मिरवणुकीतून चालत होते. तो उच्चवर्णीय कुटुंबातील मित्र होता. जोतिराव हे उच्चवर्णीय नसूनही वरातीत आलेले पाहून तेथील काही लोकांना राग आला आणि त्यांनी अपमान करून जोतिरावांस वरातीतून माघारी पाटवले. या घटनेमुळे समजातील वर्णव्यवस्थेत खालच्या स्तरावरील लोक कसे अपमानित व हालखीचे जीवन जगत आहेत याची जोतिरावांना प्रचिती आली. ही अन्यायी वर्णव्यवस्था उलथून टाकायची असा त्यांनी निर्धार केला. ही वर्णव्यवस्था नेमकी निर्माण कशी झाली याचे उत्तर मिळविण्यासाठी जोतिरावांनी वाचन सुरू केले. पुढील काही वर्षे हिंदू धर्मग्रंथ, पुराण यांसह त्यांनी मुस्लिम, बौद्ध, जैन व ख्रिस्ती धर्माचाही सखोल अभ्यास केला. अंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध विचारवंतांची पुस्तके वाचून त्यांचे विचार समजून घेतले. महाराष्ट्रासोबतच पूर्ण भारतातील विविध संत साहित्य वाचून काढले. त्यांच्या अशा प्रचंड वाचन व अभ्यासामुळे समाजातील सर्वच क्षेत्रांबद्दल त्यांना माहीत झाले. सत्याच्या आधारावर स्वतःचे क्रांतिकारी विचार मांडण्याची क्षमता निर्माण झाली. जवळपास सर्व प्रमुख धर्मांमध्ये स्त्रियांना विशेष अधिकार नाहीत हे त्यांच्या लक्षात आले. याच काळात त्यांनी सावित्रीबाईंना प्राथमिक शिक्षण दिले. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही सर्व अधिकार मिळायला हवेत असे क्रांतिकारी विचार ते आपल्या लेखनातून मांडू लागले. समाजाचा प्रचंड विरोध असतानाही त्यांनी 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा पुण्यात भिडेवाड्यात सुरू केली. या कामात त्यांना त्यांच्या मित्रांची मदत झाली. सुरूवातीला जे लोक आपल्या मुलींना जोतिरावांच्या शाळेत पाठवत त्यांना समाजाने विरोध सुरू केला. मुलींना शिक्षण देणे हे धर्मविरोधी कार्य आहे असे पालकांच्या मनात भरवून काही उच्चवर्णीय लोक मुलींना शाळेत येण्यापासून रोखू लागले. तरीही समाजाचा विरोध पत्करून जोतिरावांनी पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्व पटवून दिले. हळूहळू शाळेत मुलींची संख्या वाढू लागली. हे सर्व पाहून जोतिरावांच्या विरोधात असणारे लोक येता जाता सावित्रीबाई व जोतिरावांना अपशब्द बोलत असत, शिव्या-शाप देत असत. जोतिरावांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा ते लोक सावित्रीबाई व जोतिरावांना येता जाता दगड मारू लागले, केरकचरा अंगावर टाकू लागले. इतक्या सगळ्या हालअपेष्टा भोगूनही दोघेही खचून गेले नाहीत, त्यांनी आपले मुलींना शिकवण्याचे कार्य चालूच ठेवले. जोतिराव शाळा बंद करत नाहीत म्हणून काही उच्चवर्णीय लोकांनी त्यांचे वडील गोविंदराव यांच्या मनात जोतिराव कसे धर्मविरोधी कार्य करत आहेत हे भरवले, समाजातून बहिष्कृत करण्याची धमकी दिली; तेव्हा गोविंदरावांनी जोतिरावांना मुलींची शाळा बंद करण्याबद्दल संगितले मात्र जोतिरावांनी तसे करण्यास नकार दिला. यामुळे जोतिराव व गोविंदराव यांच्यात दुरावा निर्माण झाला. उच्चवर्णीय लोकांच्या दबावाखाली येऊन गोविंदरावांनी जोतिरावांना घर सोडून जाण्यास भाग पाडले. आपले घर, जमीन, फुलांचा व्यवसाय सोडून जोतिराव व सावित्रीबाई वेगळे राहू लागले. यावेळी शेख नावाच्या जोतिरावांच्या परिचयाच्या एका व्यक्तीने त्यांना आश्रय दिला. जमीन, व्यवसाय सोडून यावे लागले व यामुळे उत्पन्नाची साधने कमी पडू लागल्यामुळे पुढील काळात त्यांना शाळा चालवण्यासाठी प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला. जसजसा काळ पुढे जात होता, अनेक लोक आपल्या मुलींना जोतिरावांच्या शाळेत पाठवू लागले. स्त्री शिक्षणाच्या विरोधात असणार्या लोकांना जोतिरावांना कसा विरोध करावा काही समजेना, जोतिरावांच्या शाळेत मुलींसाठी स्त्री शिक्षिका नाही असे नवे कारण सांगून ते मुलींना शाळेत जाण्यापासून रोखू लागले. जोतिरावांनीच पहिली मुलींची शाळा सुरू केली होती, मग त्या आधी स्त्री शिक्षिका कुठून येणार? काही ख्रिस्ती धर्मातील स्त्री शिक्षिका त्याकाळी इंग्रजी शाळेत शिकवत असत; जोतिरावांनी त्या ख्रिस्ती शिक्षिकांना आपल्या शाळेत मुलींना शिकविण्यासाठी बोलावण्याचा विचार मांडला; मात्र ख्रिशन लोकांकडून शिकणे सामान्य लोकांना चालत नसे. ख्रिश्चन लोक शिक्षणाच्या नावाखाली धर्म बदलण्यास प्रवृत्त करतात असा त्याकाळी सामान्य लोकांचा समज होता. जोतिरावांची ही समस्या सावित्रीबाईंना कळताच त्यांनी स्वतः शिक्षिका होण्याचा विचार मांडला. तेव्हा जोतिरावांनी सावित्रीबाईंना अहमदनगर येथे मिसेस फरार व पुणे येथे मिसेस मिचेल यांच्या शाळेत शिक्षणास पाठवून शिक्षिकेचे प्रशिक्षण दिले. शिक्षिका होऊन सावित्रीबाई जोतिरावांच्या शाळेत मुलींना शिकवू लागल्या. त्यानंतर सावित्रीबाईंची मैत्रीण फातिमा शेख यांनीही शिक्षेकेचे प्रशिक्षण घेतले. सावित्रीबाई या देशातील पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या तर फातिमा शेख या मुस्लिम समाजातील पहिल्या प्रशिक्षित शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. जोतिरावांनी 1848 नंतर काही काळ मिशनच्या एका शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यातून येणारे पैसे त्यांना घर व शाळा चालविण्यासाठी अपुरे पडू लागले. मुंबई येथील एक गृहस्थ जोतिरावांचे चाहते होते. त्यांची मुंबईमध्ये विविध धातूच्या वस्तु तयार करण्यासाठी लागणार्या साहित्याची एजन्सी होती. त्याचीच एक शाखा म्हणून जोतिरावांनी पुण्यात दुकान टाकले. हे दुकान चांगले चालू लागले. यासोबतच त्यांनी भाजीपाला विक्रीचाही व्यवसाय करून पहिला, पुढे आपल्या मित्रांच्या बरोबर भागीदारीत त्यांनी बोगदा, धरण, पूल बांधण्याची कंत्राटे घेतली. आर्थिक परिस्थिती सुधारू लागताच 1851-52 मध्ये जोतिरावांनी पुण्यात चिपळूणकरवाडा, रास्तापेठ, वेताळपेठ यथे मुलींसाठी आणखी तीन शाळा सुरू केल्या. चिपळूणकरवाडा येथील शाळेच्या सावित्रीबाई या मुख्याध्यापिका होत्या. या तिन्ही शाळांत मिळून त्याकाळी शंभराहून अधिक मुली शिक्षण घेत होत्या. शाळेत स्त्री शिक्षिका आहे मात्र ती उच्चवर्णीय नाही असे नवे कारण सांगून काही तथाकथित धर्मरक्षक लोक सावित्रीबाईंना विरोध करू लागले. त्यांना शिव्या-शाप देऊ लागले. येता-जाता अंगावर शेण टाकणे, पान-तंबाखू खाऊन थुंकणे असे प्रकार घडू लागले. सावित्रीबाई सोबत जास्तीचे कपडे घेऊन शाळेत जाऊ लागल्या. लोकांनी चिखल, शेण अंगावर फेकून घाण झालेले कपडे त्या शाळेत बदलत असत. इतका सगळा त्रास सहन करून सावित्रीबाई शाळेत शिकवण्यास जात असत, त्यांनी मुलींना शिकवणे बंद केले नाही. हे पाहून लोकांनी जास्त त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा सावित्रीबाईंना लोकांपासून वाचवण्यासाठी जोतिरावांनी एक अंगरक्षक नेमला.
जोतिरावांच्या सर्व शाळांत हळू हळू मुलींची संख्या वाढू लागली होती. सर्व शाळांतून उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाई. फुलेंच्या कार्याची दखल इंग्रज सरकारने घेतली व 1852 च्या नोव्हेंबर महिन्यात पुण्यात एक कार्यक्रम आयोजित करून मुंबईच्या गवर्नरच्या उपस्थितीत सावित्रीबाई व जोतिरावांचा दोनशे रुपयांची शालजोडी देऊन सत्कार करण्यात आला. ज्याकाळी शिक्षकांचा पगार 10-12 रुपये होता त्याकाळी गवर्नरने स्वतः एवढ्या मोठ्या रकमेची शाल देऊन सत्कार करणे ही खूप मोठी गोष्ट होती. फुलेंचा असा सत्कार होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण इंग्रज सरकारपुढे त्यांचे काहीच चालले नाही. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना जोतिरावांनी उपस्थितांना स्त्री शिक्षणाचे महत्व सांगितले आणि इंग्रज सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा असे सुचविले. त्या काळी दादोबा पांडुरंग तर्खडकर हे शाळांचे अधिक्षक होते. त्यांनी 12 फेब्रुवारी 1853 रोजी फुलेंच्या शाळेतील 237 मुलींची पुना कॉलेज येथे परिक्षा घेतली. परिक्षा कशी असते हे पाहण्यासाठी 3 हजारहून अधिक लोकांची गर्दी तिथे जमली होती. कॉलेज बाहेर रस्त्यावरही लोकांची तितकीच गर्दी होती. परीक्षेतील मुलींचे यश पाहून मुलीही शिकू शकतात हे जनमाणसात सिद्ध झाले. इंग्रज सरकारने याची दखल घेतली. मुलींच्या शिक्षणाला हळूहळू समाजमान्यता मिळू लागली. फुलेंची ख्याती सर्वत्र पसरली. फुले इतके दिवस स्वखर्चाने शाळा चालवत होते; आता त्यांना विविध संस्थांकडून, लोकांकडून या कार्यासाठी मदत होऊ लागली. इंग्रज सरकारने दक्षिणा प्राईझ समिती मार्फत फुलेंच्या शाळेला 75 रु देणगी सुरू केली. पुढील पाच वर्षानंतर वर्णव्यवस्थेत शूद्र समजल्या जाणार्या सर्वच समाजासाठी शाळा काढण्यासाठी सरकारने भोकरवाडी जवळ 6 एकर जमीन दिली. शिक्षणाचे महत्व सर्वांना पटू लागले आणि शिक्षणसंस्था उभारण्यास प्रारंभ झाला. जोतिरावांनी इतर सहकार्यांच्या मदतीने मुलींसाठी, अस्पृश्य समजासाठी शिक्षण संस्था उभारल्या. भारतामध्ये पूर्वी ज्या मराठी प्राथमिक शाळा होत्या त्याच्या अभ्यासक्रमात अक्षरओळख व देवी-देवतांच्या कथा शिकवण्यावरच जास्त भर असायचा, तर इंग्रजी शाळांतही असेच होते; इंग्रजी शाळेतील ख्रिस्ती शिक्षकांनी विद्यार्थ्याला धर्मपरिवर्तन करायला भाग पाडल्याच्या अनेक घटना झाल्या होत्या. फुलेंच्या शाळेत भौतिकशास्त्र, भूगोल, इतिहास, व्याकरण, भाषा, गणित, कृषिविज्ञान, रसायनशास्त्र असे विषय शिकवले जायचे. यामुळे फुलेंच्या शाळेतील शिक्षणाचा दर्जा हा इतर शाळेंच्या तुलनेत खूपच चांगला होता. पुण्याबाहेर असणारे लोकही आता त्यांच्या पाल्यांना पुण्यात फुलेंच्या शाळेत पाठवू लागले. बाहेरच्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय व्हाही म्हणून फुलेंनी 'सुशिक्षणगृह' हे बोर्डिंग सुरू केले. या बोर्डिंगमध्ये 25 ते 30 विद्यार्थी शिक्षण घेत. ज्यांना शक्य असेल ते खर्चासाठी पैसे देत तर इतर विद्यार्थी मोफत राहात असत. फुलेंनी त्यांच्या शाळांतील हुशार व गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीवरून ग्रंथालयही सुरू केले. शिक्षणपद्धतीत अनेक सुधारणा करून विविध उपक्रम राबवले. सर्वच समाजातील मुला-मुलींना फुलेंच्या शाळांमध्ये काळाशी सुसंगत असे व्यवसायाभिमुख, नैतिक दर्जेदार शिक्षण मिळू लागले. फुलेंनी जुनी शिक्षणपद्धती मोडीत काढून आधुनिक शिक्षणाची सुरुवात केली होती.
सामाजिक सुधारणा
फुलेंनी मुलींच्या शाळा काढून मोठी क्रांती घडवली होती. मुलींच्या शाळा फक्त पुण्यातच न राहता इतर ठिकाणीही सुरू कराव्यात असे त्यांना वाटत होते; पण नव्या शाळा उभारण्यासाठी जागा, आर्थिक सहाय्य, शिक्षक यासाठी इंग्रज सरकारचे सहकार्य अपेक्षित होते. मात्र 1857 च्या उठावला देशभर सुरुवात झाली आणि इंग्रज सरकार हादरले. मुलींच्या शिक्षणाला विरोध करणारे लोक शाळा बंद करण्यासाठी उठावाच्या काळात इंग्रज सरकारवर दबाव आणू लागले. इंग्रज सरकारची कोंडी झाली. शाळांसाठी मदत करणे सरकारने थांबवले. समाजात सुधारणा करायच्या असतील तर लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे हे फुलेंच्या ध्यानात आले. फुले आधीपासूनच समाजातील विविध चाली-रिती, रूढी-परंपरांवर आपल्या लेखनातून कडाडून टीका करत होते. 1851 साली 'भटाभिक्षुकांना सवाल', 1853 साली 'निर्मिकाचा शोध', 1854 साली 'मनुस्मृतीचा धिक्कार', 1855 साली 'तृतीय रत्न' हे नाटक अशी पुस्तके फुलेंनी लिहली होती. सामाजिक सुधारणा घडवून आणायच्या असतील तर चळवळ, जनआंदोलने उभी करून सक्रिय सहभाग असण्याची गरज त्यांना जाणवली. इंग्रज सरकारने शाळांसाठी मदत बंद केली म्हणून फुलेंनी सरकारवर कडाडून टीका केली. पुढे 1857 चा उठाव मावळल्यावर हळूहळू फुलेंनी काही शाळा सरकारच्या ताब्यात दिल्या तर काही शाळा त्यांनी उभ्या केलेल्या संस्थांच्या ताब्यात दिल्या व स्वतःला इतर सामाजिक कार्यासाठी वाहून दिले.
शाळेचे काम करत असतानासुद्धा जोतिराव अनेक सामाजिक कार्यात पुढाकार घेत. 1854 मध्ये पुण्यात जुलाब-उलटी याची साथ आली होती. अनेक लोक आजारी पडत होते. त्यावेळी आपल्या सहकार्यांना सोबत घेऊन जोतिरावांनी पूर्ण पुणे शहर स्वच्छ केले होते. सार्वजनिक पाणवठ्यात निर्जंतुकीकरण करण्यासाठी इंग्रज सरकारकडून औषध घेऊन पाण्यात टाकले होते. यावेळी काही उच्चवर्णीय लोकांनी त्यांना विरोध केला. जोतिरावांनी पाणवठ्याला शिवलेले त्यांना सहन होत नव्हते; मात्र इंग्रजांनी या कार्यासाठी जोतिरावांना पाठिंबा दिला व जोतिरावांनी आपले कार्य संपूर्ण पुण्यात चालू ठेवले. शाळेच्या कामातून वेळ मिळेल तेव्हा व समाजाला गरज असेल तेव्हा जोतिराव सामान्य लोकांच्या मदतीस धावून जात, विविध सामाजिक कार्यात नेतृत्व करत. जोतिरावांनी सुरू केलेले स्त्री शिक्षण हे पुण्यातील काही उच्चवर्णीय लोकांना मान्य नव्हते. अनेक प्रकारे विरोध करूनही जोतिरव शाळा बंद करत नव्हते. 1856 साली एका रात्री जोतिराव घरी असताना दोन तरुण हातात तलवारी घेऊन त्यांना मारण्यासाठी आले. 'मला मारून तुमचे कल्याण होणार असेल तर खुशाल मारा' असे जोतिरावांनी सांगताच त्या दोन्ही तरुणांनी जोतिरावांची माफी मागितली. जोतिरावांनी त्यांचे मनपरिवर्तन केले आणि पुढे हेच दोन तरुण फुलेंची चळवळ वाढवण्यासाठी काम करू लागले.
विधवा स्त्रियांच्या जीवनातील सुधारणा:
फुलेंनी विधवा विवाहाचे समर्थन केले. 1856 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा इंग्रज सरकारने केला; पण प्रत्यक्षात मात्र अशा विवाहस समाज मान्यता नव्हती. फुलेंनी त्याआधी 1855 सालीच एका विधुर व विधवेचा विवाह लावून दिला. यांनंतरही पुढील काळात त्यांनी विधवा विवाह लावून दिले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे अनेक विधवांनी पुनर्विवाह केले. 1857 मध्ये सरकारने घटस्फोटाचा कायदा केला; पतीच्या जाचाला कंटाळलेल्या स्त्रियांसाठी हा कायदा वरदान ठरला. अशा स्त्रियांच्या घटस्फोटाचे फुले व इतर सुधारकांनी समर्थन केले.
त्याकाळी ब्राम्हण विधवांचे केस कापले जायचे. त्यांनी कुरूप दिसावे यासाठी अंगावर दागिने घालण्याची परवानगी नसायची. विधवेने चुकून जरी चांगले दिसण्याचा प्रयत्न केला तर तिला जबर शिक्षा व्हायची. केस कापण्यास नकार देणार्या विधवांचे हात-पाय बांधून जबरदस्तीने केस कापले जायचे. यात त्यांचे खूप हाल व्हायचे. असे हाल त्या विधवेला प्रत्येक महिन्याला सहन करावे लागत. ही पद्धत बंद व्हावी म्हणून फुलेंनी विरोध केला. न्हाव्यांना एकत्रित जमवून त्यांचे प्रबोधन केले. त्यांचा संप घडवून आणला. विधवेचे केस कापण्याचे भाव वाढवले. फुलेंच्या या कार्यास काही सुधारक ब्राम्हण लोकांनीही पाठिंबा दिला व केस कापण्यापासून विधवांची सुटका होऊ लागली. त्यांचे हाल थांबले.
त्याकाळी खासकरून उच्चवर्णीय समाजामध्ये विधवांना कसलाही मान-सन्मान दिला जात नव्हता. विधवेला व तिच्या मुलांना तुच्छतेने वागवले जाई. त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेतली जात. कोणत्याही मंगल कार्यामध्ये त्यांना सहभागी होण्यास मनाई असे. मूल-बाळ नसलेल्या विधवांवर पुरुष नातेवाईकांकडून, गुंड प्रवृत्तीच्या पुरुषांकडून अत्याचार होत असे. अशा संबंधातून होणारी अपत्ये जन्मल्यावर मारून टाकली जात किंवा जन्मन्याआधीच गर्भपात केला जाई. त्याचबरोबर पती पत्नीला मुलगी जन्माला आली तर मुलींच्याही हत्या होत. हे रोखण्यासाठी फुलेंनी 1863 साली 'बालहत्या प्रतिबंधकगृह' हे वसतिगृह सुरू केले. तेथे विधवा स्त्रियांना आश्रय दिला जाई, त्यांची काळजी घेण्याचे व त्यांच्या मुलांना शिकवण्याचे काम सावित्रीबाई स्वतः करत असत. ज्या स्त्रियांना त्यांची जन्मलेली मुले सांभाळायची नाहीत त्या स्त्रिया आपली मुले तिथेच सोडून जात. सावित्रीबाई त्या मुलांचा सांभाळ करत.
द्विभार्या प्रथेला विरोध:
सावित्रीबाई व जोतिरावांना मूल होत नव्हते. काही लोकांनी जोतिरावांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला तेव्हा जोतिरावांनी त्यांच्यावर कडक टीका केली. स्त्रियांनी मूल होत नाही म्हणून दूसरा नवरा आणला तर चालेल का? स्त्रिया पतीच्या निधनानंतर सती जातात, पण एक तरी पुरुष आजपर्यंत पत्नीचे निधन झाले म्हणून सती गेला आहे का? असे उलटप्रश्न ते करीत. पत्नी जशी आपल्या पतिशी एकनिष्ठ असते तसेच पतीनेही आपल्या पत्नीशी एकनिष्ठ असले पाहिजे असे त्यांचे मत होते. जोतिरावांनी दूसरा विवाह न करता 1974 साली 'बालहत्या प्रतिबंधकगृह' या त्यांच्या वसतिगृहात आलेल्या एका विधवा स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला. त्याचे नाव यशवंत असे ठेवले. फुलेंनी द्विभार्या प्रथेला स्वतःच्या आचारणातून विरोध केला.
विवाहविषयक सुधारणा:
फुलेंनी सुरुवातीपासूनच बालविवाहास विरोध केला. मुला-मुलीने आपल्या पसंतीने जोडीदाराची निवड करावी व त्यासाठी प्रथम ते प्रौढ असले पाहिजेत असे त्यांचे मत होते. त्यांनी आपल्या दत्तकपुत्र यशवंताचे लग्न प्रौढ वयात एका प्रौढ मुलीशीच लावले. यशवंतचा विवाह अंतरजातीय व अंतरवर्णीय होता. तसेच तो विवाह लावण्यास भटजीला न बोलवता जोतिरावांनी सुरू केलेल्या सत्यशोधक पद्धतीने पार पडला. पेशव्यांच्या पुण्यात त्याकाळी ते अतिशय धाडसी पाऊल होते. या विवाहावरुन फुलेंचे कुटुंब व यशवंतच्या पत्नीचे कुटुंब यांना खूप त्रास सहन करावा लागला. तरीही फुलेंनी अशा प्रकारच्या विवाहांना प्रोत्साहन दिले व असे अनेक विवाह लावून दिले. आजही फुलेंचे अनेक अनुयायी सत्यशोधक पद्धतीने विवाह करतात.
जातिभेद निर्मूलन:
यशवंतचा अंतरजातीय व अंतरवर्णीय विवाह हे जातिभेद निर्मूलनासाठी फुलेंनी टाकलेले धाडसी पाऊल होते. सुरुवातीच्या काळापासूनच फुले कसलाही जातिभेद मानत नसत. पुण्यात नगरपालिका होती. त्या पालिकेत बहुतेक कर्मचारी हे उच्चवर्णीय होते. पालिकेकडून पुरवल्या जाणार्या नागरी सुविधा उच्चवर्णीय लोकांच्या वस्तीत पुरवल्या जायच्या मात्र अस्पृश्य व इतरांच्या वस्तीतील सुधारणांकडे दुर्लक्ष केले जाई. उच्चवर्णीय लोकांच्या वस्तीत पाणी साठवण्यासाठी मोठ मोठे हौद बांधण्यात आले होते. नळाचे पाणी त्या हौदात साठवले जाई. उच्चवर्णीय लोक प्रथम पाणी भरत आणि मग उरलेले पाणी इतरांसाठी ठेवले जाई. मात्र हौदाला इतरांनी स्पर्श केलेला त्यांना चालायचे नाही. त्यांच्यापैकी एखादा उच्चवर्णीय व्यक्ति इतरांना पाणी वाढत असे. हा पाणी वाढणारा व्यक्ति त्याच्या सोईप्रमाणे येई त्यामुळे अस्पृश्यांना पाण्यासाठी ताटकळत बसावे लागे. पाणी वाढणारा व्यक्ति आलाच नाही की अस्पृश्यांचे पाण्यावाचून हाल व्हायचे. ही गोष्ट फुलेंच्या लक्षात आली. 1868 साली घराच्या अंगणातील विहीर सावित्रीबाई व जोतिरावांनी अस्पृश्यांसाठी खुली केली. स्वतःच्या हाताने पाणी भरण्याची ही या लोकांची पहिलीच वेळ होती. अस्पृश्यांच्या मानत फुलेंविषयी प्रचंड आदर निर्माण झाला. पुढे 1872 मध्ये फुलेंनी जाहीरनामाच काढला, "जे लोक नीतीस अनुसरून चांगले काम करत असतील, अशा लोकांना अस्पृश्य समाजातील असले तरी मी माझ्या बांधवांप्रमाणे वागविण, त्यांच्याबरोबर अन्नव्यवहार करीन". हा जाहीरनामा त्यांनी तत्कालीन वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्धही केला होता. फुले स्वतः वर्णव्यवस्थेवर टीका करणारे व ती कशी चुकीची आहे हे सिद्ध करणारे लिखाण करत असत. फुलेंच्या परिचयाचे व प्रार्थना समाजाचे कार्य करणारे तुकाराम तात्या पडवळ यांनी 'जातीभेदाचे वास्तविक स्वरूप आणि त्यापासून होणारे विपरीत सामाजिक परिणाम' हे पुस्तक लिहले. या पुस्तकाची पहिली आवृत्ती निघाली आणि स्वतःला धर्मरक्षक म्हणवून घेणार्या लोकांनी चिडून पुस्तकाचा प्रचंड विरोध केला. या पुस्तकात संस्कृत ग्रंथाचा आधार घेऊन सप्रमाण जातीभेदाचे खंडन केले होते. पुस्तकाची दुसरी आवृत्ती छापण्यास कोणीही प्रकाशक तयार होईना, या वेळी 1865 साली जोतिरावांनी स्वतःचे नाव प्रकाशक म्हणून दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जोतिरावांच्या मनात अतिशय आदर होता. ते त्यांना 'कुळवाडी भूषण', 'रयतेचा राजा' असे गौरवाने म्हणत असत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पवाडा लिहला. त्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ते पुण्याहून रायगडावर गेले. तेथील विस्तीर्ण परिसरात समाधीचा शोध घेतला. झाडाझुडपांत त्यांना समाधी सापडली. ती झाडे-झुडपे तोडून उपटून तो परिसर साफ केला. समाधी धुवून त्यावर फुले वाहिली. तेथून परत आल्यावर 'शिवजयंती महोत्सव मंडळ' स्थापन करावे असा विचार त्यांनी आपल्या सहकार्यांसमोर मांडला व 1867 मध्ये मंडळ स्थापन करून शिवजयंती महोत्सव साजरा केला. त्यानंतर पुढील काळात समधीचा जीर्णोद्धारही केला. सर्व जाती-धर्मातील लोकांना स्थान असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याचा आदर्श त्यांच्यासमोर होता.
सत्यशोधक समाजाची स्थापना व कार्य
फुले सामाजिक कार्यात अग्रेसर होते. जसजसा काळ पुढे जात होता, तसंतसं फुलेंच्या चळवळी, आंदोलने अधिक व्यापक होऊ लागले. गावोगावचे लोक फुलेंच्या विचारांनी प्रभावित झाले. या सुधारणा चळवळी संपूर्ण महाराष्ट्रभर उभ्या करण्यासाठी त्याला संघटनात्मक रूप देणे आवश्यक असल्याचे मत फुलेंच्या सहकार्यांनी मांडले. 24 सप्टेंबर 1873 रोजी यासाठी फुलेंच्या प्रमुख साठ सहकार्यांच्या उपस्थितीत 'सत्यशोधक समाज' या संघटनेची स्थापना करण्यात आली. नैतिक भूमिकेने, सार्वजनिक पातळीवर सत्याचा शोध घेणारी, सार्वजनिक सत्याचा आग्रह धरणारी, सत्याच्या अनेक बाजू, शक्यता लक्षात घेणारी ही संघटना आहे.
सत्यशोधक समाजाची तत्वे:
१) सर्व मनुष्ये एकाच ईश्वराची लेकरे आहेत व तो सर्वांचा मायबाप आहे
२) भक्तांना ईश्वराची ओळख करून देण्यासाठी व प्रसन्न करून घेण्यासाठी उपाध्याय किंवा धर्मगुरू असल्या मध्यस्थाची जरूरी नाही
३) हे तत्व ज्याला मान्य आहे, तो सत्यशोधक समाजियन होय
भट, सावकार, इंग्रज सरकारचे अधिकारी यांच्याकडून होणार्या शोषण व अन्यायाला विरोध, मानवी हक्कांची शिकवण, मानसिक व सामाजिक गुलामगिरीतून बहुजनांची मुक्तता; हा सत्यशोधक समाजाचा त्रिसूत्री कार्यक्रम होता.
सत्यशोधक समाजाची कार्ये:
1875 मध्ये महर्षी दयानंद सरस्वती यांनी 'आर्य समाज' ची स्थापना केली. वर्णव्यवस्था, जातिभेद यावर ते कडक टीका करत. ते पुण्यात आले तेव्हा त्यांच्या अनुयायांनी त्यांची भव्य मिरवणूक काढण्याचे ठरविले; मात्र स्वतःला धर्मरक्षक म्हणवून घेणार्या पुण्यातील लोकांनी यास विरोध केला. ही गोष्ट जोतिरावांना समजताच त्यांनी मिरवणुकीस पाठिंबा दिला व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मिरवणुकीस संरक्षण दिले. विरोध करणार्या लोकांनी मिरवणुकीत गोंधळ-दंगा करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना पिटाळून लावण्यात आले. म्हणजे त्याकाळी जो कोणी समाज सुधारण्यासाठी प्रयत्न करत असेल त्याला सत्यशोधक समाजाने नेहमीच पाठबळ व संरक्षण दिले.
1877 मध्ये महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ पडला. अन्नपाण्यावाचून लोकांचे हाल होत होते. इंग्रज सरकार मदत करण्यास फारच विलंब लावत होते. यावेळी सत्यशोधक समाजाने धनकवडीजवळ एक कॅम्प उघडला. येथे भुकेल्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. दररोज दोनशेहून अधिक लोक त्या कॅम्पमध्ये येत असत. फुलेंनी वृत्तपत्रात लेख लिहून दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले. अनेक नामवंत धनाढ्य लोकांनी पुढे येत आर्थिक सहाय्य केले आणि अगदी काही दिवसांतच सत्यशोधक समाजाने अशाप्रकारचे 52 कॅम्प विविध ठिकाणी चालवले. या कॅम्पमधील स्वयंपाकाची व्यवस्था सावित्रीबाई स्वतः करत असत. प्रत्येक कॅम्पमध्ये सत्यशोधक समाजाच्या महिला कार्यकर्त्या स्वयंपाक करत तर पुरुष इतर व्यवस्था पाहात. दुष्काळाची परिस्थिती सुधारेपर्यन्त असे कॅम्प चालूच होते. पुढे फुलेंनी त्याकाळच्या नामवंत नेत्यांना पत्रव्यवहार करून दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा कायदा तयार करण्यास इंग्रजांवर दबाव आणण्याच्या सूचना केल्या. यामुळे इंग्रज सरकारने 'डेक्कन एग्रिकल्चरिस्ट रिलीफ एक्ट' हा कायदा बनवला व दुष्काळग्रस्तांना इंग्रज सरकारकडून मदत मिळू लागली.
1877 नंतर इंग्रज सरकारने दारूची निर्मिती वाढवली. दारूच्या विक्रीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र पुण्यातील जनता सहज उपलब्ध होणार्या दारुमुळे व्यसनी बनत चालली होती. जोतिराव त्याकाळी (1876-1882) सरकारकडून नेमलेले नगरपालिकेचे सदस्य होते. त्यांनी नगरपालिकेतील कर्मचार्यांना व्यसनमुक्तीच्या कामास का लावू नये? असा प्रश्न पालिकेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांना केला. तसेच दारूच्या आहारी जाऊन समजातील नैतिकता कमी होत चालली आहे व राज्यकर्ते म्हणून समाजाची नैतिकता जपण्याचे काम केले पाहिजे असे सांगणारे पत्र त्यास लिहले. एखाद्या पालिकेच्या सदस्याने अध्यक्षांना चार गोष्टी शिकवणारे पत्र लिहण्याचे धाडस त्याकाळी कोणीही केले नव्हते. जोतिरावांनी ते केले. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी नागरी भागात दारू विकण्यास नेहमीच विरोध केला.
1875 पर्यन्त मुंबईत चाळीसहून अधिक कापड गिरण्या उभ्या राहिल्या. गिरणीत काम करणार्या लोकांचा प्रचंड मोठा वर्ग मुंबईत राहत होता. या कामगारांना अल्प मोबदल्यात 12 ते 14 तास रोज काम करावे लागे. सुट्ट्या मिळत नसत. कामगार स्त्री आहे की पुरुष की बाल कामगार आहे याचा विचार न करता सर्वांना राबवून घेतले जाई. कामगारांचे शोषण होत होते; परंतु त्यांच्या वतीने गिरणी मालकांना बोलण्याचे धाडस कोणी करत नव्हते. सत्यशोधक समाजाचे याकडे लक्ष गेले. जोतिरावांनी मुंबईला जाऊन गिरणी कामगारांसमोर भाषणे दिली. सत्यशोधक समाजाचे सदस्य नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1880 साली 'मील हँड असोशिएशन सोसायटी' ही कामगारांची देशातील पहिली संघटना स्थापन केली. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी इंग्रज सरकारपुढे गार्हाणे मांडण्याचे व त्यांच्यावर दबाव आणण्याचे काम या संघटनेने केले. यातूनच कामगारांच्या हिताचे कायदे इंग्रज सरकारला करावे लागले.
1883 मध्ये काही काळ जोतिराव मुंबईला गेले होते. एके दिवशी एका मुलीला देवदासी म्हणून सोडण्यासाठी तिचे कट्यारी सोबत लग्न लावण्यासाठी मिरवणूक निघाली होती. त्याकाळी देवदासी म्हणून देवीला सोडलेल्या मुलींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असत. अशा बहुतेक मुलींना वाईट लोकांच्या अत्याचारामुळे देवदासीच्या नावाखाली वेश्या बनून राहण्याची वेळ येई. ही प्रथा बंद झाली पाहिजे असे जोतिरावांना वाटत होते. लग्नाची ती मिरवणूक पाहून जोतिरावांनी पोलिसांकडे जाऊन ते लग्न थांबण्याचे सुचविले. या प्रथेचे वाईट परिणाम खूप पटवून दिल्यावर पोलिसांनी ते लग्न थांबवले. मुंबईमध्ये एकच खळबळ उडाली. असे लग्न थांबवण्याची ही पहिलीच घटना होती. इंग्रज अधिकारी हिंदूंच्या धर्मात ढवळाढवळ करत आहेत अशी सर्वत्र टीका होऊ लागली. त्यामुळे त्याकाळी इंग्रजांनी यातून माघार घेतली. जोतिरावांच्या प्रयत्नांना त्यावेळी यश आले नाही मात्र पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी या प्रथेला विरोध केला व महाराष्ट्र सरकारला ही प्रथा नष्ट करणारा कायदा करावा लागला.
जोतिराव स्वतः शेती करत होते. त्यांना शेतकर्यांना येणार्या सर्व समस्या माहीत होत्या. शेतकर्यांच्या हिताच्या सूचना ते इंग्रज सरकारला नेहमी करत असत. मुळामुठा धरणात पाणी असूनही त्याच्या कालव्याचे पाणी घेण्यास शेतकरी घाबरत असत. पाणी घेतले तर इंग्रज सरकार आपल्या जमिनी जप्त करील अशी त्यांची समजूत होती. जोतिरावांनी पुढे होत आपल्या शेतीसाठी कालव्याचे पाणी घेतले. परिसरातील सर्व शेतकर्यांना कालव्याचे पाणी शेतीसाठीच सोडलेले आहे हे पटवून दिले. कालव्याच्या पाण्यामुळे शेतकर्यांना बागा लावता आल्या, विविध पिके घेता आली. शेतकर्यांनी शेतीसोबत काहीतरी जोडधंदा करावा असा प्रचार सत्यशोधक समाज करत असे. जोतिरावांनी 'शेतकर्यांचा असूड' या प्रबंधामधून शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध उपाय सुचवले आहेत.
1885 मध्ये मुंबईचे राज्यपाल 'लॉर्ड रे' यांचे नाव देवून पुण्यात बाजारासाठी 'रे मार्केट' ही मोठी इमारत बांधण्यात आली. त्याकाळी प्रचंड पैसे खर्च करून ती इमारत बांधण्याची गरज नव्हती म्हणून जोतिरावांनी तिकडे पैसे खर्च न करता जनतेच्या कल्याणसाठी पैसे खर्च करावे असे नगरपालिकेस सुचवले होते. पण इंग्रज अधिकार्यांनी इमारत बांधलीच. तिथे गाळे भाड्याने घेण्याची ऐपत त्याकाळी सामान्य विक्रेत्यांची नव्हतीच. परिणामी गाळे रिकामे राहू लागले. नगरपालिकेला इतके पैसे खर्च करून इमारतीतून काहीच उत्पन्न मिळेना. इंग्रजांनी जबरदस्तीने मारझोड करून सामान्य व्यापर्यांना गाळे घेण्यास प्रवृत्त केले. नुसते भाडे देऊनच व्यापारी वैतागले, उत्पन्न काहीच मिळेना. तेव्हा सत्यशोधक समाजाने नगरपालिकेस व इंग्रज अधिकार्यांस विरोध केला. सामान्य लोकांना इमारतीबाहेर व्यापार करण्यासाठी इंग्रज अधिकार्यांपासून संरक्षण दिले. याच इमारतीस आता 'फुले मार्केट' म्हणून ओळखले जाते.
सत्यशोधक समाजाने जवळपास सर्वच क्षेत्रांत सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. आजही ते कार्य चालू आहे. आधुनिक भारत घडविण्यात सत्यशोधक समाजाचे कार्य खूप मोलाचे आहे.
महात्मा पदवी बहाल
1888 च्या मे महिन्यात जोतिराव काही कामाकरिता मुंबईला गेले असता, तेथील अनुयायांनी एक सभा आयोजीत केली. मांडवी कोळीवाडा हॉलमध्ये भरवण्यात आलेल्या या सभेत अडीच हजारहून अधिक लोक जोतिरावांचे भाषण ऐकण्यासाठी जमले होते. रा.ब. वडेकर, जे. पी, रा. ब. लोखंडे, डॉ. लाड अशी प्रतिष्ठित पुढारी मंडळी उपस्थित होती. या सभेत मुंबईच्या जनतेकडून जोतिरावांना 'महात्मा' म्हणून गौरविण्यात आले.
जीवनान्त
1887 मध्ये पक्षाघाताचा आजार झाला आणि जोतिरावांचा पुढील काही काळ आजारपणातच गेला. १८८८ च्या जुलै महिन्यात अर्धांगवायूच्या आजारामुळे त्यांची संपूर्ण उजवी बाजू निकामी झाली. आजारपणातही त्यांना सर्व समाजास अंधश्रद्धेतून बाहेर काढले पाहिजे असे वाटत होते. त्यांनी डाव्या हाताने 'सार्वजनिक सत्यधर्म' हा ग्रंथ लिहून काढला. या पुस्तकातून त्यांनी लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी विविध २७ विषयांवर आपले विचार मांडले. सावित्रीबाईंनी आजारपणात त्यांची खूप सेवा-शुश्रुषा केली. समाजकार्यात सगळे धन खर्ची पडत होते; आपल्या उपचारासाठीही त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. डॉ. घोले यांनी जोतिरावांवर उपचार केले व यात त्यांना महाराज सयाजीराव गायकवाड यांची मदत झाली. पहिल्या आजारपणातून बरे झाल्यावर पुन्हा दोन वर्षानी आजारपण वाढले. मृत्यूपूर्वी दोन महीने ते आजारीच होते. जोतिरावांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. त्यांचे सर्व सहकारी, मित्र, अनुयायी यांची त्यांना भेटण्यासाठी रांग लागू लागली. "माझ्या अंतकाळी तुमच्या सगळ्यांचे दर्शन झाले आणि तुम्ही सत्यशोधक समाजाचे कार्य चालवत आहात, हे पाहून मला आता मृत्यू आला तरी आनंद आहे. तुम्ही हे कार्य न डगमगता चालू ठेवा. सत्यावर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत राहा. मी गेलो तरी दु:ख मानू नका, सृष्टीचा क्रम कोणाला चुकत नाही." हे त्यांचे शेवटचे उपदेश होते. त्यानंतर त्यांना बोलायलाही जमेना. 27 नोव्हेंबर 1890 रोजी रात्री 28 नोव्हेंबरच्या पहाटे दोनच्या सुमारास त्यांचा जीवनान्त झाला. सगळीकडे शोकवार्ता पसरली. हजारोंच्या संख्येने लोक जोतिरावांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी जमा झाले. घरासमोरील अंगणातच आपल्याला पुरावे असे जोतिरावांनी आधीच संगितले होते. त्यांनी अंगणात समाधीही बांधली होती. मात्र संबंधित अधिकार्यांनी तेथे पुरण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे स्मशानभूमीवर अग्नी देऊन त्यांचा अंत्यविधी केला गेला. त्यांच्या अस्थी घरासमोरील त्या समधीत ठेवल्या गेल्या. जोतिरावांच्या इच्छेप्रमाणे तेराव्या दिवशी सर्व रूढींचा त्याग करून गोर-गरीबांना अन्नदान केले, वस्त्रे दिली गेली. विध्यर्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले.
जोतिरावांनंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समजाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. स्त्रियांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. स्त्रियांसाठी 'गृहिणी' हे मासिक त्यांच्याच पाठपुराव्याने सुरू झाले. समाजकार्यासाठी सावित्रीबाई नेहमीच पुढाकार घेत. 1897 मध्ये प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना त्यांनाच प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपले आयुष्य इतरांसाठी खर्च केले.
आधुनिक भारतातील आद्य समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रिबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम! आपण त्यांचे हे कार्य पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करूया!
संदर्भग्रंथ
महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा जोतिबा फुले - श्री. गुंदेकर
महात्मा ज्योतिराव फुले - पं. सी. पाटील
विकीपेडिया
-------------------*------------------
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कार्य, मराठी माहिती, निबंध, जयंती, पुण्यतिथी, मूळगाव, शैक्षणिक कार्य, ग्रंथ, Jyotirao Phule, Savitribai Phule, information, चरित्र, charitra, biography

Comments
Post a Comment