सार्वजनिक सत्यधर्म
1891 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात विविध विषयांवर महात्मा फुले यांनी आपले विचार मांडले आहेत. फुलेंनी आपल्या मृत्यूपूर्वी डाव्या हाताने या पुस्तकाचे लिखाण केले. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र यशवंतराव यांनी ते प्रकाशित केले. प्रश्न आणि उत्तर या स्वरुपात पुस्तकाचे लेखन आहे. येथे फुलेंनी दिलेल्या उत्तरांचा सारांश घेत आहे.
महात्मा फुले म्हणतात,
"सत्य वर्तन केल्याशिवाय मानव प्राणी जगात सुखी होणार नाही". सत्य हे माणसाला सुख देणारे आहे असे त्यांना म्हणायचे आहे.
"या पृथ्वीवर मानवांनी जेवढीही धर्मपुस्तके केली आहेत, त्यांपैकी एकाही ग्रंथात सुरुवातीपासून शेवटपर्यन्त सारखे सार्वजनिक सत्य नाही. कारण ते धर्मग्रंथ लिहिणार्या लोकांनी ते त्या काळास, प्रसंगास अनुसरून लिहिले आहेत."
"पृथ्वीचा निर्माणकर्ता जर एक आहे; तर तिच्यावरील अनेक देशांतील लोकांचा एकमेकांशी वैरभाव का आहे? प्रत्येकामध्ये धर्माभिमान का आहे? एकमेकांबद्दल हेवा व द्वेष का आहे? सर्व नद्या महासागरांस मिळतात तर मग एखाद्या देशातीलच नदी पवित्र का आहे? या पृथ्वीवरील सर्व मानव प्राणी अवयवाने व बुद्धीकौशल्याने एकसारखे आहेत; मग त्यापैकी काही लोकच पिढ्यानपिढ्यापासून पवित्र बनून श्रेष्ठ कसे होऊ शकतात? सर्वांप्रमाणेच त्यांनाही जन्ममरण आहे; मग ते सर्वांप्रमाणे नाहीत का?
"हे आकाश अनंत आहे. त्यात आपल्या सूर्यमंडळासारखी अनेक सूर्यमंडळे असतील, अनेक पृथ्वी, ग्रह असतील; मग या अनंत पोकळीमध्ये या विश्वाचा निर्माता कुठे बसला आहे हे आपण मनुष्य प्राणी कसे काय शोधणार? आपल्याच्याने तर शेजारील ग्रहांवरतीसुद्धा जाणे होत नाही. त्यामुळे त्या निर्मात्याला शोधत बसण्यापेक्षा इथूनच त्याला मनोभावे नम्रतेने प्रणाम करू."
"या पृथ्वीवरील सर्व गोष्टी जर निर्मात्याने तिच्यावर राहणार्या प्राण्यांसाठी बनवल्या आहेत; त्याची पूजा करताना त्याला आपण त्यानेच बनवलेली फुले वाहतो; हे म्हणजे त्याचीच वस्तु उलट त्यालाच देण्यासारखं आहे. जर त्या निर्मात्याला देण्यासाठी आपल्याजवळ स्वतःचे असे काहीच नाही, सगळे काही त्याचेच बनविलेले आहे; तर आपण त्याच्यावर काय वाहून त्याची पूजा करणार? म्हणून जो व्यक्ति स्वकष्टाने आपल्या कुटुंबाचे पोषण करतो व जगाच्या कल्याणासाठी झटतो; अशा व्यक्तीला फुलांच्या माळा अर्पण केल्या तर त्या फुलांचे सार्थक होईल."
"मी तुमच्या नावाने एखाद्या धातूच्या अथवा दगडाच्या मूर्तीवर फुले वाहून तुमचे नामस्मरण केले तर त्याचा तुम्हाला काही फायदा होणार आह काय? एखाद्या मुलाने काही काम न करता त्याच्या वृद्ध माता-पित्यासमोर बसून 'माझी माता, माझे पिता' असे पोकळ नामस्मरण केले; तर त्यांचे कल्याण होणार आहे काय? याउलट त्या मुलाने काही काम करून स्वकष्टाने त्यांचा सांभाळ केला तर त्यांचे कल्याण झाल्यावचून राहणार नाही. ते सुखी, आनंदी होतील. म्हणून त्या निर्मात्याचे पोकळ नामस्मरण करत बसण्यापेक्षा कोणालाही त्रास न देता, कुठलाही भेदभाव न पाळता स्वकष्टाने आपली उपजीविका भागवली, आपल्या कुटुंबाला सांभाळले तर नक्कीच त्या निर्मात्याचा मान राखला असे होईल."
"त्या निर्मात्यानेच तयार केलेल्या अन्नाचा नैवेद्य उलटा त्यालाच कसा अर्पण करावा? त्यापेक्षा चांगल्या लोकांना गरजेवेळी, ज्यांचे हात-पाय चालत नाहीत अशा लोकांना, पोरक्या लोकांना आपल्याने शक्य तितकी मदत करावी; म्हणजे त्या निर्मात्याला नैवेद्य अर्पण केल्यासारखे होईल. मग तो व्यक्ति भट, अमेरिकन अथवा कोणीही असो; कोणताही भेद न करता आपण चांगल्या लोकांना गरजेवेळी मदत करावी"
"जवळपास सर्व धर्म पुस्तकांत स्वर्ग आहे असे लिहिले आहे; परंतु या पृथ्वीवरील एकतरी गृहस्थ जिवंतपणी स्वर्ग पाहून परत आला आहे असे सांगता येईल काय? असे कधी घडले आहे काय? असा एकतरी मनुष्य या भूभागावर सापडेल काय?"
"स्त्री व पुरुष यांपैकी स्त्रीच श्रेष्ठ आहे. कारण स्त्री पुरूषांचे घर सांभाळते. त्याच्या मुलांचे आपल्या उदरी नऊ महिने ओझे वाहते, मुलांना जन्म देते, त्यांना सांभाळते. ती तिच्या पतीवर मनापासून प्रेम करते. पतीचे निधन झाले तर कित्येक पत्नी सती गेल्याची उदाहरणे आहेत; पण आजपर्यंत एखादा पुरुष 'सता' गेला आहे काय? स्त्री घरात असल्याशिवाय घर शोभत नाही. स्त्री लग्नंनातर पुरुषाच्या घरी नांदते. त्या पुरुषाने दुसरी, तिसरी सवत घरी आणली तरी त्या एकत्र नांदतात; पण स्त्री 'सवता' म्हणून दूसरा पती घरी आणत नाही. स्त्रियांसाठी एक नियम व पुरुषांसाठी दुसरे नियम, हा निव्वळ पक्षपात आहे."
"स्वतःला सुख प्राप्त व्हावे म्हणून इतरांना शारीरिक व मानसिक पीडा दिली नाही, म्हणजे त्याला पुण्य म्हणावे. जसे इतरांनी तुम्हाला त्रास दिलेले आवडणार नाही; तसे तुम्ही त्रास दिलेला इतरांनाही आवडणार नाही. म्हणून इतरांची एखादी वस्तु कपट करून किंवा जबरदस्तीने उपभोगण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही."
"मानवी प्राण्यांत मूळ जातिभेद नाही. जर पशु-पक्षांत जातिभेद नाही, तर मानव प्राण्यांतच जातिभेद कोठून आला? मानवातील चार वर्ण ब्रम्हदेवाच्या विविध अवयवांतून निर्माण झाले, तर मग पशु-पक्षी, जलचर हे त्याच्या कोणत्या अवयवापासून निर्माण झाले? पशु-पक्षांत कोण ब्राम्हण, कोण शूद्र हे दाखवता येईल काय? केवळ भट्ट ब्राम्हणाच्या ग्रंथांत लिहिले आहे म्हणून त्यांच्या तोंडाच्या भूलथापांना बळी पडून जातिभेदाचे थोतांड आपण का मानतो? जातिभेद मानने हा आपला शुद्ध वेडेपणा आहे."
"आपल्या सर्वांच्या निर्मिकास संतोष देण्यासाठी सार्वजनिक सत्याचे भय मनी धरून जो कोणी इतर मानव बांधवांबरोबर आचरण करील, त्यास नीती म्हणावी; मग तो कोणत्याही धर्माचा असो."
"जिवंतपणी माता-पित्यांचे हाल करून, मेल्यानंतर त्यांच्या नावे श्राद्ध घालून भटा-ब्राम्हणास सुवर्ण, धन, वस्त्रे वगैरे दान केल्याने त्या माता-पित्याला कोठे आणि कसे सुख लाभणार आहे? म्हणून भटा-ब्राम्हणास दान करण्यापेक्षा आपल्याला दु:खात साथ देणार्या मित्र, नातेवाईक मंडळींना भोजन द्यावे. शाळकरी मुलांना शाळेचे साहित्य देऊन मदत करावी."
शेतकर्यांचा असूड
1883 साली लिहिलेल्या या पुस्तकातून महात्मा फुले यांनी त्या काळचे शेतकरी उच्चवर्णीय लोकांकडून, अधिकार्यांकडून कशा प्रकारे लुटले जात होते, त्यांच्यावर कशा प्रकारे अन्याय होत होता, त्याकाळच्या शेतकर्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती, त्यांना त्या अन्यायापासून वाचविण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत या विषयांवर भाष्य केले आहे. आपण या प्रकरणात या पुस्तकाचा सारांश पाहाणार आहोत.
महात्मा फुले म्हणतात,
"पहिल्या प्रकारच्या अक्षरशून्य शेतकर्यांस भट-ब्राम्हण धर्ममिषाने इतके नाडितात की, त्याबद्दल या जगात इतर कोणते उदाहरण सापडणे फार कठीण. धूर्त ग्रंथकर्त्यांनी आपल्या मतलबी धर्माचे लिगाड शेतकर्यांच्या मागे इतके सफाईने लावले आहे की, शेतकरी जन्मास येण्यापूर्वीच तो आईच्या गर्भात असतो, तेव्हा गर्भसंस्कारापासून ते मरेपर्यंत कित्येक गोष्टींनी लुटला जातो, इतकेच नव्हे तर तो मेला तरी त्याच्या मुलांस श्राद्ध वगैरे यामुळे धर्माचे ओझे वाहावे लागते."
"वर्षभरात येणारे सण-वार, ग्रहणे, लग्नकार्याच्या वेळी, वास्तूशांती वगैरे अशा प्रत्येक दिवशी भट-ब्राम्हण धर्माच्या नावाने विविध पूजा मांडून, पोथ्या वाचून, पोकळ भजने करून शेतकर्यांकडून तूपपोळ्यांची भोजने घेतात, शिधा घेतात, दक्षिणा म्हणून वस्त्र, पायताने, पैसे, गाद्या, छत्र्या वगैरे यांपैकी काही घेतात. शेतकर्याच्या मुलांच्या पत्रिकेत विविध दोष काढून त्याला घाबरवितात, मग त्या दोषांची शांति करण्यासाठी पूजा मांडून त्यास लुटतात. शेतकर्यास तिर्थयात्रेस पाठवतात व मग तिर्थक्षेत्राच्या ठिकाणचे भट-ब्राम्हण धर्माच्या नावाने शेतकर्यास लुटतात. म्हणजे, या ना त्या कारणाने शेतकरी आयुष्यभर नकळतपणे लुटला जातो आणि या बदल्यात त्याला विद्या द्यावी असे भट-ब्राम्हणास वाटत सुद्धा नाही. उलट आपल्या ग्रंथांचा आधार घेऊन 'शुद्रास विद्येचा अधिकार नाही' असे शेतकर्यांच्या मनावर बिंबवले आहे."
"अज्ञानी शेतकर्यांच्या पैशाची व वेळेची भट-ब्राम्हणाकडून इतकी हानी होते, की त्याला आपली मुले शाळेत पाठवावी असा विचारसुद्धा येत नाही. विचार आलाच तर 'शूद्र शेतकर्यांस ज्ञान देऊ नये' हे त्यांच्या मनावर बिंबवलेले आहेच, त्यामुळे आपली मुले शाळेत पाठवण्याची हिंमतही त्याला होत नाही."
"आता इंग्रज सरकारने शूद्रांस नगरपालिकेत विविध खात्यात कामावर घेण्याचा अधिकार दिला आहे; पण सरकारी कचेर्यांत आपले वर्चस्व असणारे भट-ब्राम्हणांनी तेथे शुद्रांस ठकले नाही म्हणजे भट-ब्राम्हणांच्या गंगेत घोडे नहाले असे आम्ही समजू."
"सरकारी गोरे अधिकारी हे बहुतकरून ऐषआरामात गुंग असल्यामुळे त्यांना शेतकर्यांच्या वास्तविक स्थितीबद्दल माहिती करून घेण्यापुरती सवड होत नाही व या त्यांच्या गाफिलपणामुळे सर्व सरकारी खात्यांत ब्राम्हण कामगारांचे प्राबल्य असते. या दोन्ही कारणांमुळे शेतकरी इतके लुटले जातात की, त्यांना पोटभर भाकर व अंगभर वस्त्रही मिळत नाही."
"पूर्वीच्या काळी हिंदुस्थानात अनेक परदेशी, यवनी बादशहा व स्वदेशी राजेरजवाडे होते. त्यांच्याकडे कित्येक शूद्र लोक सैनिक म्हणून, कामगार म्हणून कामाला होते. प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ति त्यांच्याकडे कामाला असायचा, त्यामुळे त्याच्या कुटुंबास शेतसारा भरण्यास फारशी अडचण येत नसे. परंतु आता इंग्रज सरकार आले व सर्व राजेरजवाडे लयास गेल्याने सुमारे पंचवीस लक्ष शूद्र लोक बेकार झाले आहेत. आणि त्या सगळ्यांचा बोजा शेतकी करणार्यांवर पडला आहे."
"इंग्रज सरकारमुळे हिंदुस्थानात नेहमी होणारी लढायांची धुमाळी थांबली, मनुष्य वध होण्याचे थांबून सगळीकडे शांतता झाली खरी, पण या देशात स्वार्या व शिकारी बंद पडल्यामुळे एकंदर सर्व लोकांचे शौर्य व मर्दानगी लयास गेली आहे. राजेरजवाडे भागू बायांसारखे दिवसा सोवळे नेसून देवपूजा करण्यात गुंग होऊन रात्री निरर्थक उत्पत्ती वाढविण्याच्या छंदात लंपट झाल्यामुळे येथील लोकसंख्या मात्र फार वाढली. यामुळे शेतकर्यांमध्ये भाऊ-हिस्से इतके वाढले की, कित्येकांस आठ-दहा पेर्यांच्या पाभरीवर गुजारा करावा लागतो. अशा आठ-दहा पाभरीच्या पेर्यांकरिता एक-दोन बैल जवळ बाळगण्याची ऐपत नसल्यामुळे ते आपली शेती शेजार्यापाजार्यांस अर्धेलीने अथवा खंडाने देऊन, आपली बायको मुले सोबत घेऊन कुठेतरी परगावी जाऊन मोलमजुरी करतो."
"पूर्वी ज्या शेतकर्यांजवळ फारच थोडी शेतजमीन असे व ज्याचा शेतीवर निर्वाह होत नसे, असे शेतकरी आसपासच्या डोंगर दर्याखोर्यांतील जंगलांतून उंबर, जांभूळ वगैरे झाडांची फळे खाऊन, पळस, मोहा वगैरे झाडांची फुले-पाने आणि जंगलातील लाकूडफाट्या विकून पोट भरण्यापुरता पैसा जमा करीत. गावच्या गायरानाच्या भिस्तीवर आपल्याजवळ एक दोन गायी, तीन चार शेळ्या पाळून त्यांच्यावर गुजारा करून आनंदात गावात राहत असत. परंतु आता इंग्रज सरकारने फॉरेस्ट खाते तयार करून सगळ्या गायरान जमिनी, जंगलजमिनी, पर्वत, डोंगर-दर्या ताब्यात घेतले त्यामुळे दीनदुबळ्या शेतकर्यांच्या शेळ्यांस, जनावरांस या भूभागावर रानचा मोकळा वारा खाण्यापुरतीही जागा उरली नाही. हे दीनदुबळे शेतकरी आता साळी, कोष्टी, सनगर, लोहार, सुतार वगैरे लोकांच्या हाताखाली काम करू लागले होते तोच इंग्रज सरकार विलायतेत यंत्रावर तयार केलेले समान येथे आणून स्वस्त दरात विकू लागल्याने इथल्या मालास मंदी आली आहे आणि इथले कामगार बेकार होऊन कंगाल झाले आहेत. आपला उदारनिर्वाह चालविण्यासाठी कित्येकांना डाळीच्या चुणीवर, तांदळाच्या व गव्हाच्या कोंड्यावर, आंब्यांच्या कोयांवर गुजराण करावी लागत आहे. कित्येक जण आपल्या बायको मुलांची स्थिती पाहवत नसल्याने उधारीची नशा करून बेशुद्ध होऊन पडलेले असतात. त्यांची स्थिती अजून किती भयंकर होईल याचा अंदाज देशकल्याणाची खरी इच्छा असणार्यासच येईल."
"हल्लीचे सरकार आपल्या कामगारांस मन मानेल तसे पगार व पेन्शन देण्यासाठी नानाप्रकारचे नित्य नवे कर शेतकर्यांचे बोकांडी बसवून, त्यांचे धन गोळा करू लागल्यामुळे शेतकरी अट्टल कर्जबाजारी झाले आहेत. सरकारने शेतकर्यांकडून पैसे गोळा करायचे बाजूला ठेवून त्यांच्या आचरणावरही लक्ष द्यावे. त्यांची परिस्थिती कशी सुधारेल यावर विचार करावा. शेतकर्यांनी एकापेक्षा जास्त बायका करू नयेत व आपल्या मुलांची लग्ने लहानपणीच करू नयेत म्हणून कायदा करावा, त्याशिवाय ते त्यांच्या मुलांचे चांगल्याप्रकारे संगोपन करू शकणार नाहीत. भट-ब्राम्हणाच्या लोकसंखेच्या प्रमाणात त्यांना सरकारी नोकर्या द्याव्या आणि इतर नोकर्या बाकी सर्व जाती-धर्मातील लोकांस द्याव्या, असे केले तरच भट-ब्राम्हण शूद्र शेतकर्यांच्या शिक्षणाच्या आड येणार नाहीत. नाहीतर सर्व खात्यांत त्यांचाच भरणा असल्यामुळे सरकार त्यांच्याच इशार्यावर चालत राहील, जनतेची सत्य परिस्थिती गोर्या अधिकार्यांना कळणारही नाही. शेतकर्यांच्या मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याकरिता त्यांच्याच जातीतील शिक्षक तयार करून शाळा चालवाव्या व त्या शाळांत शेतकर्यांची सर्व मुले पाठवावी असा कायदा करावा."
"सरकारने एकंदर सर्व शेतकर्यांस युरोपातील शेतकर्यांप्रमाणे विद्यादान देऊन त्यांस यंत्राद्वारे शेतीची कामे करण्यास शिकवावीत. तसेच या देशात गाय-बैल मारून खाण्यावर बंदी आणणारा कायदा करावा अथवा बाहेरील देशातून गाय-बैल आणावेत; त्याशिवाय शेतकर्यांना शेतीसाठी चांगल्या गायी-बैलांचा पुरवठा होणार नाही. शेतकर्यांजवळ गायी-बैलांचा पुरवठा झाला म्हणजे त्यांची शेतीची कामे वेळेत उरकतील व शेणखताचा पुरवठाही होईल. डोंगरपर्वतावरील गवत-झाडांच्या पान-फुलांचे, मेलेल्या कीटक श्वापदांचे, मांसहाडांचे कुजलेले सत्व, वळवाच्या पावसाने धुपून पाण्याच्या पुराबरोबर ओढ्या-नाल्यांत वाहून जाऊ नये म्हणून सरकारने जागो-जागी अशा पद्धतीने बांध बांधवेत की ते पाणी शेतात मुरून पुढे जाईल, यामुळे शेते फारच सुपीक होतील. सरकारने सर्व तळी बांधून काढवीत म्हणजे भर उन्हाळ्यात त्यात पाणी राहील व जमिनीत पाणी मुरून शेतकर्यांच्या विहिरीस पाणी राहील, त्यामुळे सर्व ठिकाणी बागायती होईल. तसेच ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे झरे निघातील असा अंदाज असेल ती ठिकाणं गावच्या नकाशावर दाखवून त्या ठिकाणी जो शेतकरी विहीर बांधील त्यास बक्षिसे द्यावीत. नदी-नाल्यांत व तलावांत साचलेला गाळ शेतकर्यांना फुकट नेऊ द्यावा व ज्या गावची गायरने सरकारने फॉरेस्ट खात्यात सामील केली असतील ती सर्व त्या गावांस परत करावीत. सरपण व शेताच्या कामासाठी लाकडे तोडण्याची परवानगी द्यावी व इमारतींसाठी लाकडे तोडण्यास सक्त मनाई करणारा कायदा करावा. सरकारने थोडे पैसे खर्च करून बाहेरच्या देशातील चांगल्या जातीच्या शेळ्या-मेंढ्या इथे आणून त्यांची पैदास करावी म्हणजे त्यांची संख्या वाढून त्यांच्या लेंढ्या-मुताचा खत मिळेल व लोकरही मिळेल. रानटी जनावरांपासून स्वतःचे व शेतीमालाचे रक्षण करण्यासाठी शेतकर्यांच्या हातात जुन्या बंदुका देण्याचे धाडस सरकारला होत नसेल तर आपल्या पोलिस खात्याला त्या रानटी जनावरांपासून शेतकर्याचे संरक्षण करण्याच्या कामी लावावे व रानडुकरांनी वगैरे शेतीचे नुकसान केले तर सरकारने त्याबद्दल शेतकर्यांस नुकसान भरपाई द्यावी. शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी चांगले उत्पादन काढणार्या शेतकर्यांना बक्षिसे द्यावीत, त्यांना शेतीच्या पदव्या द्याव्यात. शेतकर्यांच्या मुलांना युरोपात आधुनिक शेती कशी होते ते पाहण्यास पाठवावे म्हणजे ते इकडे येऊन शेतीत सुधारणा करतील. मुलांना शेतीची कामे शिकवून त्यांच्या परीक्षा घ्याव्यात व त्यांना पदव्या द्याव्यात."
सदरी लिहिलेल्या गोष्टींचा विचार सरकारने केल्याशिवाय शेतकर्यांचे भाग्य बदलणार नाही.
गुलामगिरी
1873 साली प्रथम प्रकाशित झालेल्या या पुस्तकातून फुलेंनी आर्य लोक भारतात कसे आले व त्यांनी इथल्या मूळ राजांना कसे हरविले, इथल्या लोकांना मानसिक गुलामीत कसे ढकलले, त्याबद्दल संगितले आहे, आर्य लोकांनी रचलेले ग्रंथ व त्यातील गोष्टी कशा काल्पनिक वाटतात हे पटवून दिले आहे. हे पुस्तक प्रश्न उत्तर या स्वरुपात आहे; फुलेंचे सहकारी त्यांना विविध शंका, प्रश्न विचारतात व फुले त्यांच्याशी संवाद करून त्याची उत्तरे देतात, असे पुस्तकातील लिखाणाचे स्वरूप आहे. या पुस्तकाचा सारांश आपण इथे पाहू.
Comments
Post a Comment